भारतीय संघ परदेश दौऱ्यावर असताना, खेळाडूंची पत्नी आणि गर्लफ्रेंड सोबत असण्यावरुन मध्यंतरीच्या काळात बराच उहापोह झाला होता. BCCI ने यावेळी खेळाडूंसाठी काही नियमही घालून दिले होते. ज्यामध्ये खेळाडूंना आपली पत्नी आणि गर्लफ्रेंडसोबत वेळ घालवण्यासाठी ठराविक वेळ देण्यात येणार होता. आगामी विश्वचषकासाठीही BCCI भारतीय संघासाठी नवा नियम घालून दिला आहे.

New Indian Express वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, विश्वचषकात पहिल्या सामन्यानंतर भारतीय खेळाडूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेंडना सोबत राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. ५ जून रोजी भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विश्वचषकातला पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यानंतर खेळाडू आपल्या पत्नीला सोबत आणू शकणार आहे. गेल्या वर्षभरापासून भारतीय संघ व्यवस्थापन, BCCI कडे दौऱ्यात पत्नी आणि गर्लफ्रेंडला सोबत नेण्याची परवानगी मागत होती.

मात्र या परवानगीला क्रिकेट प्रशासकीय समितीने कधीही पूर्णपणे मान्यता दिली नव्हती. मध्यंतरीच्या काळात पहिल्या दोन आठवड्यांपर्यंत खेळाडूंना आपली पत्नी आणि गर्लफ्रेंडना सोबत ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र संघ व्यवस्थापनाकडून सतत होत असलेल्या मागणीमुळे बीसीसीआयने अखेर, खेळाडूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेंडला सोबत नेण्याची परवानगी देण्यात आल्याचं समजतंय.