भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला लागलेले दुखापतींचे ग्रहण अद्यापही कायम आहे. आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा दुखापतीमुळे ब्रिस्बेन येथील चौथ्या कसोटीला मुकणार हे मंगळवारी स्पष्ट झाल्यानंतर आता अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या समावेशाबाबतही साशंकता निर्माण झाली आहे.

ब्रिस्बेन येथे शुक्रवारपासून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील अखेरच्या कसोटीला प्रारंभ होणार आहे. सध्या ही मालिका १-१ अशी बरोबरीत असल्याने चौथ्या कसोटीचे महत्त्व वाढले आहे. परंतु एकामागोमाग एक जायबंदी होणाऱ्या खेळाडूंमुळे या कसोटीसाठी सर्वोत्तम अंतिम ११ खेळाडू निवडण्याचे आव्हान कर्णधार अजिंक्य रहाणे आणि संघ व्यवस्थापनापुढे आहे.

हनुमा विहारीच्या साथीने तिसरी कसोटी अनिर्णीत राखण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या ३४ वर्षीय अश्विनच्या पाठीची दुखापत अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करतानाच अश्विनला पाठीवर चेंडू लागल्यावर असह्य़ वेदना होत असल्याचे निदर्शनास आले. गुरुवारी अश्विनची तंदुरुस्ती चाचणी होणार असून या चाचणीच्या निकालानंतरच अश्विन चौथ्या कसोटीत खेळणार की नाही, हे स्पष्ट होईल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. बुधवारी झालेल्या सराव सत्रात अश्विन फारशी गोलंदाजी करतानाही आढळला नाही, त्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींच्या चिंतेत वाढ झाली आहे.

भारतीय खेळाडूंचा कसून सराव

चौथ्या कसोटीसाठी ब्रिस्बेन येथे दाखल झालेल्या भारतीय खेळाडूंनी बुधवारी कसून सराव केला. बुमरा या कसोटीला मुकणार असला तरी त्याने या सराव सत्राला उपस्थिती लावून अन्य वेगवान गोलंदाजांना मार्गदर्शन केले. नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर आणि टी. नटराजन यांनी या सराव सत्रात घाम गाळला. त्याशिवाय फिरकीपटू कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदरदेखील गोलंदाजी करताना आढळले. फलंदाजांपैकी रोहित शर्मा, शुभमन गिल आणि अजिंक्य रहाणे यांनी सहभाग नोंदवला.

सेहवागची ब्रिस्बेनला जाण्याची तयारी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघाला खेळाडूंची कमतरता जाणवल्यास आपण ब्रिस्बेनला जाण्यास तयार आहोत, असे मत भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने केले आहे. एकामागून एक खेळाडू दुखापतीमुळे या मालिकेतून माघार घेत असल्याने सेहवागने ‘बीसीसीआय’ला त्याच्या विलगीकरणाबाबत विचारविनिमय करण्याचे सुचवले आहे. ‘‘भारताचे अनेक खेळाडू जायबंदी आहेत. चौथ्या कसोटीसाठी ११ खेळाडू उपलब्ध नसल्यास मी ऑस्ट्रेलियाला जाण्यास तयार आहे. विलगीकरणाविषयी ‘बीसीसीआय’ काय ते पाहून घेईल,’’ असे ‘ट्वीट’ सेहवागने केले. चाहत्यांनी मात्र सेहवाग ऑस्ट्रेलियात गेल्यास ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना कोणीही वाचवू शकणार नाही, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

‘आयपीएल’मुळे खेळाडू जायबंदी -लँगर

गतवर्षी इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) आयोजन चुकीच्या काळात करण्यात आल्यामुळेच भारतासह ऑस्ट्रेलियन खेळाडूंनाही अनेक प्रकारच्या दुखापतींना सामोरे जावे लागत आहे, असे स्पष्ट मत ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी व्यक्त केले. करोना साथीच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी सप्टेंबर-नोव्हेंबरमध्ये ‘आयपीएल’ खेळवण्यात आली. ही स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघ थेट ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला.

‘‘मी ‘आयपीएल’चा मोठा चाहता आहे. परंतु यंदा ‘आयपीएल’च्या आयोजनाची वेळ चुकली, असे मला वाटते. कारण यानंतर १५ दिवसांच्या कालावधीतच भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला प्रारंभ झाला. ऑस्ट्रेलियापेक्षा भारताच्याच महत्त्वपूर्ण खेळाडूंना यादरम्यान झालेल्या दुखापतींमुळे माघार घ्यावी लागली, ’’ असे लँगर म्हणाले. त्याशिवाय चौथ्या कसोटीसाठी विल पुकोवस्की पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यास डावखुऱ्या मार्कस हॅरिसला डेव्हिड वॉर्नरच्या साथीने सलामीला संधी देण्यात येईल, असेही लँगर यांनी सांगितले.

..तरीही ऑस्ट्रेलियावर दडपण -लायन

चौथ्या कसोटीत जवळपास भारताच्या दुसऱ्या फळीतील खेळाडूंविरुद्ध आमचा सामना होणार असला, तरी आमच्यावर कामगिरी उंचावण्याचे दडपण असेल, असे मत ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने व्यक्त केले. ‘‘भारताचे बहुतांश प्रमुख खेळाडू चौथ्या कसोटीला मुकणार असले तरी आम्हाला यामुळे फारसा लाभ होणार नाही. कारण पहिल्या तीन कसोटींमध्येही भारताने उपलब्ध खेळाडूंच्या साथीने कडवी झुंज दिली. त्यापेक्षा तिसऱ्या कसोटीत झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळण्याकडे आमचे प्रमुख लक्ष्य आहे,’’ असे लायन म्हणाला.