प्रशिक्षक रोलंट ओल्टमन्स यांची हकालपट्टी झाल्यानंतर हॉकी इंडियाने त्यांच्या जागी जोर्द मरीन यांची नियुक्ती केली. बांगलादेशात होणारा आशिया चषक हा भारतीय हॉकी संघ आणि मरीन यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातोय. आशिया चषक हा भारतीय संघासाठी आणि माझ्यासाठी नवीन सुरुवात असल्याचं मरीन यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणलं आहे.

अवश्य वाचा – लोकांच्या टीकेकडे लक्ष देत नाही – जोर्द मरीन

“आगामी १५ महिन्यांमध्ये आपल्याला काय साध्य करायचं आहे, याची कल्पना मी खेळाडूंना दिली आहे. त्यानूसार आम्ही सरावाला सुरुवातही केली आहे. आगामी काळात भारतीय हॉकी संघाला हॉकी वर्ल्डलीग फायनल, आशियाई खेळ, राष्ट्रकुल स्पर्धा, आणि हॉकी विश्वचषक यासारख्या महत्वाच्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवायचा आहे. बांगलादेशमध्ये होणारा आशिया चषक जिंकूनच आम्ही परत येऊ, अशी आता सर्व भारतीय संघाची मानसिकता तयार करण्यात मला यश आलं आहे.” मरीन पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणत होते.

सध्या भारताचा हॉकी संघ ‘साई’च्या केंद्रात आपला सराव करत आहे. खेळाडू आणि नवीन प्रशिक्षकांमध्ये चांगले संबंध निर्माण व्हावेत यासाठी प्रत्येक दिवसाचा सराव संपला की, सरदार सिंह, एस.व्ही.सुनील आणि कर्णधार मनप्रीत सिंह खेळाडूंचा अभिप्राय मरीन यांना कळवत आहेत. भारताचा गोलकिपर पी.आर.श्रीजेशही मरीन यांना संघाने कोणत्याही बाबतीत अजुन सुधारणा करणं गरजेचं आहे याची माहिती देतोय.

ढाका शहरात होणाऱ्या आशिया चषकात भारताचा सामना हा यजमान बांगलादेश, पाकिस्तान आणि जपान यांच्याशी होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारतीय संघ कशी कामगिरी करतोय, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.