24 January 2020

News Flash

बेंगळूरु विजयाची हॅट्ट्रिक साधणार?

कोहली आणि एबी डी’व्हिलियर्स यांनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळेच बेंगळूरुने पंजाबला धूळ चारून यंदाच्या हंगामात गुणांचे खाते उघडले होते

(संग्रहित छायाचित्र)

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

चिन्नास्वामी स्टेडियमवर पराभवाचा वचपा काढण्यासाठी किंग्ज इलेव्हन पंजाब उत्सुक

सुरुवातीचे आठपैकी सात सामने गमावूनही त्यानंतर सलग दोन विजय मिळवून दमदार पुनरागमन करणाऱ्या विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये आव्हान कायम राखले आहे. त्यामुळेच बुधवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या लढतीत बेंगळूरु विजयाची हॅट्ट्रिक साधणार का, हे पाहणे रंजक ठरेल. पंजाबचे खेळाडू मात्र गेल्या आठवडय़ात बेंगळूरुकडूनच झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी उत्सुक असतील.

कोहली आणि एबी डी’व्हिलियर्स यांनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळेच बेंगळूरुने पंजाबला धूळ चारून यंदाच्या हंगामात गुणांचे खाते उघडले होते. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या सामन्यातही बेंगळूरुची या दोघांवरच प्रामुख्याने मदार असेल. त्याशिवाय यष्टिरक्षक पार्थिव पटेल व मोईन अली यांनादेखील मोक्याच्या क्षणी सूर गवसला आहे.

मुख्य म्हणजे अनुभवी वेगवान गोलंदाज डेल स्टेनच्या धडाकेबाज पुनरागमनामुळे बेंगळूरुच्या संघात नवचैतन्य संचारले आहे. स्टेनने आपल्या दोन्ही सामन्यांत पहिल्याच षटकांत बेंगळुरूला यश मिळवून दिले आहे. मात्र उमेश यादव आणि मोहम्मद सिराज यांच्या सुमार कामगिरीमुळे बेंगळूरुच्या चिंतेत भर पडली आहे. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध उमेशने टाकलेल्या अखेरच्या षटकात महेंद्रसिंह धोनीने तब्बल २४ धावा फटकावल्या होत्या. मात्र अखेरच्या चेंडूवर विजयी फटका लगावण्यात धोनी अपयशी ठरल्याने उमेश व बेंगळूरुवासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यजुर्वेद्र चहल फिरकीची धुरा समर्थपणे सांभाळत आहे.

दुसरीकडे गेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभूत झाल्यामुळे पंजाबच्या खात्यात प्रत्येकी पाच विजय व पराभवांसह १० गुण असून ते गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर घसरले आहेत. सलामीवीर लोकेश राहुल व ख्रिस गेल सातत्याने योगदान देत असले तरी डेव्हिड मिलर, मंदीप सिंग, सर्फराझ खान या मधल्या फळीतील फलंदाजांच्या अपयशाचा फटका पंजाबला महागात पडत आहे.

कर्णधार रविचंद्रन अश्विन व मोहम्मद शमी संघासाठी सुरेख कामगिरी करत आहेत. मात्र संघाचे नेतृत्व करण्यात अश्विन इतर कर्णधारांच्या तुलनेत काहीसा कमी ठरत आहे. त्याशिवाय अंकित राजपूत, अँड्रयू टाय या गोलंदाजांकडून अश्विन, शमीला योग्य साथ लाभल्यास पंजाबला नमवणे बेंगळूरुसाठी कठीण जाईल. फिरकीपटू वरुण चक्रवर्ती व मुजीब उर रहमानदेखील संधीच्या प्रतीक्षेत आहेत.

संघ

* रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु : विराट कोहली (कर्णधार), एबी डी’व्हिलियर्स, पार्थिव पटेल (यष्टिरक्षक), मार्कस स्टॉइनिस, शिम्रॉन हेटमायर, शिवम दुबे, डेल स्टेन, वॉशिंग्टन सुंदर, उमेश यादव, यजुर्वेद्र चहल, मोहम्मद सिराज, हेन्रिच क्लासीन (यष्टिरक्षक), मोईन अली, कॉलिन डी ग्रँडहोम, पवन नेगी, टिम साऊदी, आकाशदीप नाथ, मिलिंद कुमार, देवदूत पडिक्कल, गुरकिराट सिंग, प्रयास राय बर्मन, कुलवंत केजरोलिया, नवदीप सैनी, हिम्मत सिंग.

* किंग्ज इलेव्हन पंजाब : रविचंद्रन अश्विन (कर्णधार), सॅम करन, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, निकोलस पूरन (यष्टिरक्षक), मोझेस हेंड्रिक्स, हार्डस व्हिलजोएन, दर्शन नळकांडे, करुण नायर, सर्फराझ खान, अर्शदीप सिंग, अग्निवेश अयाची, हरप्रीत ब्रार,  ख्रिस गेल, मुरुगन अश्विन,अँड्रय़ू टाय, लोकेश राहुल, अंकित राजपूत, मनदीप सिंग, सिमरन सिंग, मयांक अग्रवाल,  मुजीब उर रहमान, डेव्हिड मिलर.

सामन्याची वेळ : रात्री ८ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स हिंदी १

First Published on April 24, 2019 2:44 am

Web Title: will bengaluru win the hat trick of victory
टॅग IPL 2019
Next Stories
1 कोहली एक विलक्षण कर्णधार – श्रीकांत
2 पाँटिंग, गांगुली यांच्या मार्गदर्शनामुळे संघाच्या कामगिरीत सुधारणा -पृथ्वी
3 बजरंगाची कमाल!
Just Now!
X