अनुभवी व तरुण खेळाडूंमध्ये योग्य समतोल ठेवत पुणेरी पलटण संघाला आगामी प्रो-कबड्डी लीगमध्ये विजेतेपद मिळवून देईन, असे या संघाचे नवनियुक्त साहाय्यक प्रशिक्षक के.भास्करन यांनी सांगितले.

पुणे संघाच्या जर्सीचे अनावरण मंगळवारी शानदार समारंभात करण्यात आले. या समारंभाला भास्करन यांच्याबरोबरच संघाचे व्यवस्थापक कैलास कंडपाल, कर्णधार मनजित चिल्लर, अव्वल दर्जाचा खेळाडू अजय ठाकूर तसेच श्रीकांत गोरे व अमित नंदकिशोर उपस्थित होते. शिवछत्रपती क्रीडानगरीत २५ जूनपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.

‘‘पुण्याचे मुख्य प्रशिक्षक अशोक शिंदे यांच्या समवेत मी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळलो आहे. तसेच महाराष्ट्रातील कबड्डीचा मी चाहता असल्यामुळे जेव्हा मला पुण्याच्या साहायक प्रशिक्षकाच्या जबाबदारीबाबत विचारणा करण्यात आली, तेव्हा मी तत्परतेने होकार दिला,’’ असे भास्करन यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘प्रशिक्षकाची जबाबदारी ही काही सोपी गोष्ट नाही. मात्र पुण्याच्या संघात अतिशय नैपुण्यवान व जिगरबाज खेळाडू आहेत. त्यांच्याकडून सर्वोत्तम कौशल्यवान खेळ करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. शारीरिक तंदुरुस्तीवरही भर दिला जाणार आहे. कारण लागोपाठचे सामने व त्यासाठी होणारा प्रवास यामुळे खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर विपरीत परिणाम होत असतो. खेळाडूंना दुखापतीमधून तंदुरुस्त होण्यासाठी अपेक्षेइतका वेळही मिळत नाही. तरीही खेळाडूंना पुरेशी विश्रांती कशी मिळेल याचे योग्य नियोजन आम्ही करीत आहोत.’’

‘‘संघात नवीन चेहरे असले तरी सामन्यांना अद्याप बराच अवधी बाकी आहे. सराव शिबिरात समन्वयावर भर दिला जाणार आहे. गत वेळी झालेल्या चुका यंदा कशा टाळता येतील याकडेही आम्ही लक्ष देत आहोत. स्पर्धेची सुरुवात घरच्या मैदानावर होत असल्यामुळे त्याचा मानसिक फायदा आम्हाला मिळणार आहे. चांगली सुरुवात करण्यावर आमचा भर राहणार आहे,’’ असे मनजित चिल्लने सांगितले.

‘‘स्पर्धेच्या पहिल्या वर्षीच्या तुलनेत खेळाडूंमध्ये तंदुरुस्ती व पोषक आहार याबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. आम्हीदेखील त्याबाबत विशेष तज्ज्ञांची मदत घेत आहोत. चाहत्यांबाबत आम्ही तीन लाख लोकांचा टप्पा ओलांडला आहे. त्यांच्याकडून मिळणाऱ्या सूचनांचाही आम्ही स्वीकार करीत आहोत,’’ असे कंडपाल यांनी सांगितले.