देशाच्या क्रीडा क्षेत्रात पारदर्शकात आणण्यासाठीच मी भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्षपद स्वीकारले आहे. हे काम करण्यात अपयश आले तर पदाचा त्याग करीन, असे आयओएचे अध्यक्ष एन.रामचंद्रन यांनी सांगितले.
देशातील विविध खेळांच्या राष्ट्रीय संघटनांचा कारभार पारदर्शक होण्यासाठी मी या संघटनांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करणार आहे. या संघटनांचा कारभार पारदर्शी नसेल व खेळाडू घडविण्यात त्यांना अपयश येत असेल तर त्याचे उत्तरदायित्व त्यांच्यावर असेल. तसे झाल्यास अपयशी संघटनांच्या कारभारी बदलण्यास आम्ही मागेपुढे बघणार नाही असेही रामचंद्रन यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, देशातील सर्वोच्च क्रीडा संघटनेचा अध्यक्ष या नात्याने क्रीडा क्षेत्राचा विकास हेच माझे मुख्य ध्येय आहे. त्यामध्ये अपयश आले तर मी हे क्षेत्र सोडीन.
खेळाडू हेच विविध संघटनांचे आधारस्तंभ आहेत. खेळाडू आहेत म्हणून संघटना अस्तित्वात आहेत. खेळाडू खूप कष्ट करतात व देशाला पदक मिळवून देतात. त्यांच्यामुळेच संघटनांना नावलौकिक मिळत असतो हे विविध संघटकांनी लक्षात घेतले पाहिजे. देशातील क्रीडा क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर बदलास अनुरूप बदल आपल्या देशातील क्रीडा क्षेत्रात घडवून आणण्याचा माझा प्रयत्न राहील असेही रामचंद्रन यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 10, 2014 4:55 am