आधुनिक क्रिकेटमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन हे सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानले जातात. दोघांनीही १९ वर्षाखालील क्रिकेटमधून आपली कारकीर्द सुरू केली आणि पुढे ज्येष्ठ संघात स्थान मिळवलं. विराट आक्रमक आहे तर विल्यमसन शांत स्वभावाचा आहे. पण दोघांनीही आपापल्या संघाला भरपूर विजय मिळवून दिले आहेत. दोघेही अप्रतिम फलंदाज आहेत. न्यूझीलंडचा माजी खेळाडू ग्लेन टर्नर याने या दोघांच्यात तुलना करताना एक महत्वाचे मत मांडले आहे.

“सर्वोत्तम फलंदाजांमध्ये त्यांच्या स्वभावाव्यतिरिक्त इतरही फरक असतात. सामन्यात उद्भवलेल्या परिस्थितीनुसार ते फरक जाणवतात. फलंदाजांना पोषक असलेल्या खेळपट्टीवर विराट अप्रतिम खेळ करतो आणि संघाला हवा असलेला निकाल लागतो. कोहलीची खेळण्याची पद्धत चांगली आहे. सुरुवातीला तो चांगल्या प्रकारे खेळापट्टीचा अंदाज घेतो त्यामुळे वेगवान आणि फिरकी गोलंदाजीचा तो चांगला सामना करतो. पण विल्यमसनच्या खेळात शांत आणि संयमी स्वभाव असतो. दडपणाच्या स्थितीत अशा फलंदाजाकडून चूक होण्याची शक्यता कमी असते. म्हणूनच जेव्हा दडपणाची स्थिती असेल, तेव्हा मी विराटपेक्षाही विल्यमसनला फलंदाजीसाठी निवडेन”, असे टर्नर टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

विराटबाबत विल्यमसन म्हणाला होता…

“विराट कोहलीसोबत क्रिकेट खेळायला मिळाल्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो. आम्हाला एकमेकांविरुद्ध खेळायला मिळतं ही बाब खूपच भाग्याची आहे. युवा क्रिकेटपटू असताना क्रिकेटच्या मैदानावर भेटणे आणि त्यानंतर एकमेकांच्या प्रगतीचा उंचावत चाललेला आलेख पाहणे हे खूप सुखदायक असते. १९ वर्षाखालील क्रिकेट खेळत असल्यापासून कोहलीची झालेली प्रगती मी पाहिलेली आहे. आम्ही एकमेकांविरूद्ध दीर्घकाळापासून खेळतो आहोत. गेले अनेक वर्षे आम्ही एकमेकांशी क्रिकेटबद्दल गप्पा मारतो. त्यात आम्हाला एक लक्षात आले की आमच्या दोघांच्या खेळाची पद्धत आणि देहबोली वेगवेगळी आहे, पण तरीदेखील बऱ्याचशा गोष्टींमध्ये आमची मतं ही सारखीच आहेत”, असे मत विल्यमसनने विराटबाबत बोलताना मांडले होते.