News Flash

क्रीडा नियमावलीत सुधारणा करणार -गोयल

केंद्रीय क्रीडा सचिव इंजेटी श्रीनिवास यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे.

| January 3, 2017 02:59 am

कोणत्याही गुन्हय़ात अडकलेल्या संघटकांना विविध खेळांच्या संघटनांवर कोणत्याही पदावर काम करण्याची संधी देऊ नये, यादृष्टीने केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रीडा नियमावलीत काही सुधारणा केल्या जाणार आहेत, असे केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी सोमवारी सांगितले.

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली नऊ महिने तुरुंगवास काढणारे सुरेश कलमाडी तसेच गैरव्यवहाराचे अनेक आरोप असलेले अभयसिंग चौताला यांना आजीव अध्यक्षपदावर नियुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे क्रीडा क्षेत्रात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर आयओएची मान्यता काढून घेण्याचाही निर्णय केंद्र शासनाने घेतला होता. पुन्हा असे प्रसंग घडू नयेत यासाठी क्रीडा नियमावलीत सुधारणा केली जाणार आहे. त्याकरिता केंद्रीय क्रीडा सचिव इंजेटी श्रीनिवास यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे.

‘‘क्रीडा नियमावलीत सुधारणा करण्यासाठी आम्ही ऑलिम्पिकपटू, ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक, अनुभवी क्रीडा संघटक, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारविजेते खेळाडू व प्रशिक्षक, विविध खेळांच्या राष्ट्रीय संघटना आदी विविध जणांबरोबर सविस्तर चर्चा करीत आहोत. त्यांच्या सूचनेनुसार आम्ही त्यामध्ये बदल करणार आहोत. त्यानंतर श्रीनिवास यांच्या अध्यक्षतेखालील असलेली समिती राष्ट्रीय क्रीडा विकास नियमावली तयार करणार आहे,’’ असे गोयल यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 2:58 am

Web Title: will improve sports law says goyal
Next Stories
1 सूर्यकुमार यादवची चिवट झुंज
2 भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दुबईत सराव
3 मुंबईत सिंधू जिंकणार?
Just Now!
X