भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या(बीसीसीआय) अध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्यास इंडियन प्रीमिअर लीग(आयपीएल) मध्ये हस्तक्षेप करणार नाही, असे हमीपत्र एन.श्रीनिवासन यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केले.
आयपीएलमधील हितसंबंधांच्या चौकशीसाठी दोन तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असलेली समिती स्थापन करण्याचा सर्वोच्च न्यायालयाने सुचविलेल्या पर्यायावर श्रीनिवासन यांनी सहमती दर्शवून चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शविली. आणि दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई देखील करण्यात यावी, असेही मत मांडले. तसेच बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा हाताळण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यास या द्वीसदस्यीय समितीकडून क्लीन चिट मिळेपर्यंत आयपीएलपासून दूर राहीन, असे हमीपत्र श्रीनिवासन यांनी सर्वोच्च न्यायालयात दिले.
आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे श्रीनिवासन यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर न्या. मुकुल मुद्गल समितीच्या अहवालात ‘क्लीन चिट’ मिळाल्यामुळे अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा माझ्याकडे देण्यात यावीत अशी मागणी केली होती. परंतु, हितसंबंधांमुळे श्रीनिवासन यांना बीसीसीआयचे प्रमुखपद सांभाळता येणार नाही. त्यांच्या मालकीच्या आयपीएल संघाचा अधिकारी सट्टेबाजी प्रकरणात गुंतला आहे. तसेच बीसीसीआयने क्रिकेटचा त्रिफळा उडवला असून, त्यामुळे खेळ नष्ट होईल, असे खडे बोल सर्वोच्च न्यायालयाने श्रीनिवासन यांना सुनावले होते.