पुलवामा अतिरेकी हल्ल्यात 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागल्यानंतर, सर्वच स्तरातून भारताने पाकिस्तानाशी क्रिकेट सामना खेळू नये अशी मागणी होत होती. अनेक आजी-माजी खेळाडूंनी या प्रकरणावर आपापली मतं मांडली आहेत. अखेरीस भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या प्रकरणावरचं आपलं मौन सोडलं आहे. विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध खेळायचं की नाही हा निर्णय सर्वस्वी बीसीसीआय आणि सरकारचा असेल, त्यांनी न खेळण्याचा निर्णय घेतला तर भारतीय संघ विश्वचषकात खेळणार नाही. ते Mirror Now या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
“पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकात खेळायचं की नाही हा निर्णय सर्वस्वी बीसीसीआय आणि सरकारने घ्यायचा आहे. सरकार आणि बीसीसीआय जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता सरकारने संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला तरीही आम्हाला तो मान्य असेल.” रवी शास्त्रींनी आपली बाजू मांडली.
अवश्य वाचा – बीसीसीआयचं वागणं बालिशपणाचं, जावेद मियादादची टीका
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) प्रशासकीय समिती शुक्रवारी झालेल्या बैठकीत विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमधील पाकिस्तानविरुद्धच्या लढतीबाबत कोणताही निर्णय घेऊ शकली नाही. परंतु केंद्र सरकारशी सल्लामसलत करूनच भूमिका ठरवू, असे स्पष्ट केले आहे. याचप्रमाणे दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या राष्ट्राविरोधात सामने खेळू नयेत, असे आवाहन भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) सदस्य राष्ट्रांना केले जाणार आहे.
अवश्य वाचा – राजकीय फायद्यासाठी क्रिकेटला लक्ष्य करणं चुकीचं – सरफराज अहमद
First Published on February 23, 2019 11:43 am