तिरुवनंतपुरम येथे राष्ट्रीय स्क्वॉश अजिंक्यपद सुरू आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय झेंडा फडकवत ठेवणारी मूळची केरळची दीपिका पल्लीकल या स्पर्धेचा भाग नाही. मात्र तिच्या अनुपस्थितीचे कारण दुखापत नाही तर बक्षीस रक्कम आहे. देशभरात असंख्य क्षेत्रांमध्ये समानता आली असली तरी क्रीडा स्पर्धामध्ये पुरुष आणि महिला खेळाडूंच्या बक्षीस रकमेत विषमता असते. पुरुष खेळाडूंना महिला खेळाडूंपेक्षा जास्त मानधन मिळते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मान्यवर महिला खेळाडूंनी लढा देत बक्षीस रकमेत समानता आणली. भारतात मात्र क्रीडा स्पर्धामध्ये समानता आलेली नाही. जोपर्यंत बक्षीस रक्कम समान होत नाही तोपर्यंत राष्ट्रीय स्पर्धेत खेळणार नाही अशी भूमिका दीपिका पल्लीकलने घेतली आहे. या भूमिकेमुळे सलग चौथ्या वर्षी दीपिकाने राष्ट्रीय स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ‘‘स्क्वॉशमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्येही बक्षीस रक्कम समान करण्यात आली आहे, मग भारतात का नाही? हा भेदाभेद का? केरळमध्ये खेळायला मला मनापासून आवडले असते पण माझ्या भूमिकेपासून हटणार नाही,’’ असे दीपिकाने सांगितले.