श्रीलंका दौऱ्यात निर्भेळ यश संपादन केलेल्या विराट कोहलीने पुढची १० वर्ष आपण भारतीय संघात खेळणार असल्याचं स्पष्ट केलंय. नवी दिल्लीत झालेल्या एका खासगी कार्यक्रमात विराट कोहलीने हे वक्तव्य केलेलं आहे.

अवश्य वाचा – VIDEO : कोहलीची डावखुऱ्या हाताची फटकेबाजी तुम्ही पाहिलीत का?

“कित्येक क्रीडापटूंना आपण किती काळ खेळू शकतो याची कल्पना नसते. त्यामुळे प्रत्येक खेळाडूने आपल्यातली क्षमता ओळखणं गरजेचं आहे. माझ्याबद्दल बोलायचं झाल्यास, मी आता ज्या पद्धतीने सराव करतोय तसाच सराव चालु ठेवल्यास मी भारतीय संघासाठी पुढची १० वर्ष क्रिकेट खेळू शकेन.” विराट कोहली फाऊंडेशनच्या एका कार्यक्रमात कोहलीने बोलत होता.

अवश्य वाचा –कोहलीचा झंझावात कायम, श्रीलंकेविरुद्ध आणखी एक विक्रमी खेळी

विराट कोहली फाऊंडेशन आणि आरपी- संजीव गोएंका ग्रुप यांच्यातर्फे प्रत्येक वर्षी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शिष्यवृत्ती दिली जाते. गेल्या काही दिवसांमध्ये भारताने क्रिकेटव्यतिरीक्त इतर खेळांमध्ये केलेली प्रगती पाहता आगामी काळात भारत क्रीडा क्षेत्रात नक्कीच उल्लेखनीय कामगिरी करेल असा आत्मविश्वास कोहलीने व्यक्त केला आहे. या कार्यक्रमाला बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनीही हजेरी लावली होती.

यावेळी विराट कोहलीने आपल्या अनेक आठवणींना उजाळा दिला. पुलेला गोपीचंद भारतासाठी बॅडमिंटन खेळत असताना मी आणि माझे मित्र गोपीचंद सरांचा सामना पाहण्यासाठी रात्र-रात्र जागायचो. त्याच गोपीचंद सरांच्या नेतृत्वाखाली सिंधू, सायना नेहवाल यांच्यासारख्या खेळाडू आज आंतराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव मोठं करत आहेत.