क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांची माहिती

नवी दिल्ली : पॅरिस येथे २०२४मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत कबड्डीच्या समावेशासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहिती क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.

‘‘देशी खेळाचा यशस्वीपणे विकास कसा होऊ शकतो, याचे कबड्डी हे उत्तम उदाहरण आहे. भारतामध्ये क्रीडा संस्कृती रुजवण्याचे स्वप्न आता सत्यात आले आहे. २०२४च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत कबड्डीच्या समावेशासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. तो यशस्वी होईल, यावर माझा विश्वास आहे,’’ असे रिजिजूने सांगितले.

ऑलिम्पिकमध्ये कोणत्याही नव्या क्रीडा प्रकाराचा समावेश ही दीर्घ प्रक्रिया असते. त्यासाठी काही देशांचे समर्थन मिळवत पाठपुरावा करावा लागतो. सर्वात आधी त्या क्रीडा प्रकाराला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची (आयओसी) मान्यता मिळवावी लागते. मग त्या खेळाच्या आंतरराष्ट्रीय संघटनेला ‘आयओसी’ची मान्यता मिळते. मग ऑलिम्पिक क्रीडा प्रकारासाठी या खेळाच्या संघटनेला अर्ज करता येतो.

२०२४च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत कोणत्याही नव्या क्रीडा प्रकाराचा समावेश करता येणार नाही, असे २५ जूनला लुसाने येथे झालेल्या ‘आयओसी’च्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे. यजमान फ्रान्सने २०२४च्या ऑलिम्पिकसाठी ब्रेकिंग, स्पोर्ट्स क्लाइम्बिंग, स्केटबोर्डिग आणि सर्फिग या क्रीडा प्रकारांच्या समावेशाचा प्रस्ताव ठेवला आहे. आता पुढील वर्षी डिसेंबरमध्ये अस्तित्वात असलेले क्रीडा प्रकार आणि प्रस्तावित क्रीडा प्रकार यासंदर्भात चर्चा होऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल.

आपणास हे माहीत आहे का?

आशियाई क्रीडा स्पर्धेत १९९०मध्ये कबड्डीचा समावेश करण्यात आल्यानंतर भारताने आपले वर्चस्व टिकवले होते. भारताने पुरुषांमध्ये सात आणि महिलांमध्ये दोन सुवर्णपदके जिंकली आहेत. गतवर्षी जकार्ता (इंडोनेशिया) येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाला कांस्य आणि महिला संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. इराणने दोन्ही विभागांमध्ये विजेतेपद पटकावले होते.