जगभरात करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे गेली ४ महिने क्रिकेट बंद होतं. अखेरीस इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा श्रीगणेशा झाला. हळुहळु आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने सुरु होत असताना, भारतीय खेळाडू मैदानात कधी उतरणार हा प्रश्न अनेक चाहत्यांना होता. मात्र बीसीसीआयसमोर सध्या आयपीएलचा तेरावा हंगाम हे पहिलं प्राधान्य आहे. १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या काळात आयपीएलचं आयोजन युएईमध्ये होणार आहे. यानंतर तिथूनच भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होईल. सध्या अनेक नवीन खेळाडू भारतीय कसोटी संघात आपलं स्थान मिळवण्याच्या शर्यतीत आहेत. अशा परिस्थितीत भारतीय संघाचा गब्बर म्हणजेच शिखर धवनला पुन्हा कसोटी संघात स्थान मिळू शकतं का??

अवश्य पाहा – ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी असा असू शकतो भारतीय संघ…

भारतीय संघाचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने शिखर धवनच्या कसोटी भवितव्याबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. “शिखरला परत कसोटी संघात संधी मिळणार नाही असं मी कधीच म्हणणार नाही. पण ती संधी येत्या काही काळात मिळेल का?? या प्रश्नाचं उत्तर विचारल्यास माझ्यामते ते नाही असंच आहे. कारण सध्या भारतीय संघाकडे सलामीवीराच्या जागेसाठी अनेक पर्याय आहेत. रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल सध्या भारतीय संघात सलामीवीराच्या जागेसाठी हे ४ पर्याय तयार आहेत. त्यामुळे भारतीय संघाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता शिखरला कसोटी संघात स्थान मिळणं अशक्य वाटत आहे. भविष्यात त्याला संधी नक्कीच मिळू शकते, पण आता त्याला कसोटी संघात स्थान मिळणार नाही.” आकाश चोप्रा आपल्या यू-ट्युब चॅनलवर चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देत होता.

काही महिन्यांपूर्वी पाठीला झालेल्या दुखापतीमुळे शिखर धवन भारतीय संघातून बाहेर फेकला गेला होता. आतापर्यंत शिखर धवनने ३४ कसोटी सामन्यांत भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलेलं असून या सामन्यांत ७ शतकांसह शिखरच्या नावावर २ हजार ३१५ धावा जमा आहेत. कसोटी संघात शिखरला स्थान नसलं तरीही वन-डे आणि टी-२० संघासाठी शिखर हाच भारतीय संघाचा सलामीवीराच्या जागेसाठी पहिला पर्याय आहे. आगामी आयपीएलच्या तेराव्या हंगामात शिखर दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना दिसेल.