भारतीय अ‍ॅथलेटिक्समध्ये अभिमानाने घेतले जाणारे नाव म्हणजे अंजू बॉबी जॉर्ज. २००३च्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत लांब उडीत कांस्यपदक पटकावत अंजू बॉबी जॉर्जने इतिहास घडवला. जागतिक स्पर्धेत अ‍ॅथलेटिक्समध्ये पदक मिळवणारी ती त्या वेळची एकमेव खेळाडू ठरली होती. त्यानंतर देदीप्यमान कामगिरी करत अंजूने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवला. २००४च्या अ‍ॅथेन्स आणि २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अंजूने भारताचे प्रतिनिधित्व केले. पण तिची उडी पदकापर्यंत झेप घेऊ शकली नाही. सध्या दुखापतीमुळे अंजूची कामगिरी संपुष्टात आली असली तरी संसारात न रमता खेळाडू घडवण्याचा वसा तिने घेतला आहे. आपल्या अनुभवाचा खजिना युवा खेळाडूंसाठी खुला करत तिने आता देशभरातून गुणवान खेळाडू तयार करण्याचा ध्यास घेतला आहे. पुढील वर्षी जूनच्या अखेरीस अंजू बॉबी जॉर्जची अ‍ॅथलेटिक्स अकादमी खऱ्या अर्थाने नावारूपाला येणार आहे. वसई-विरार मॅरेथॉन स्पध्रेच्या निमित्ताने अंजूशी केलेली खास बातचीत-

भारतीय खेळाडूंच्या सध्याच्या कामगिरीविषयी काय सांगशील?
भारताने २००० ते २००८ या कालावधीत लांब उडीत आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्चस्व गाजवले. भारतात अनेक गुणवान खेळाडू आहेत. पण त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी चांगली न होण्यामागे अनेक कारणे आहेत. कोणत्याही खेळाडूने ५० टक्के सराव करणे आवश्यक असते आणि उर्वरित ५० टक्के स्पर्धामध्ये भाग घ्यायला हवा. आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्षांला १६ ते १८ प्रतिष्ठेच्या स्पर्धा होत असतात. पण भारतीय खेळाडू हे या स्पर्धामध्ये सहभागी होत नाहीत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली कामगिरी कशी उंचावायची, याची मानसिकता तयार होत नाही. म्हणूनच भारतीय खेळाडूंनी अधिकाधिक स्पर्धामध्ये सहभागी होऊन मानसिकदृष्टय़ा कणखर बनणे गरजेचे आहे.

भारतीय खेळाडूंना कोणत्या समस्या जाणवतात?
मुळात महत्त्वाच्या स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे मोजकेच खेळाडू आपल्याकडे आहेत. पण त्यांना सराव करण्यासाठी योग्य सुविधा मिळत नाहीत. तसेच कोणत्याही वैयक्तिक क्रीडा प्रकारात अव्वल कामगिरी करण्यासाठी प्रशिक्षकाची गरज लागते. आपल्याकडे चांगले प्रशिक्षक नाहीत. त्यामुळे भारताला परदेशातून प्रशिक्षक आयात करावे लागतात. मला परदेशी प्रशिक्षक लाभल्यामुळे ते स्पर्धेसाठी आमच्याकडून कसून तयारी करवून घेत असत. त्याचबरोबर प्रतिस्पर्धी स्पर्धकांची क्षमता, त्यांची कामगिरी यांच्याविषयीही आम्हाला जागरूक करत असत. पण आताचे खेळाडूच स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी घाबरत आहेत, त्यामुळे त्यांना मानसिकदृष्टय़ा कणखर बनवण्याची जबाबदारी ही प्रशिक्षकांची आहे.

सध्या तू हाती घेतलेल्या प्रकल्पाविषयी काय सांगशील?
सध्या धावपटू आणि लांब उडीपटूंसाठी अकादमी स्थापन करण्याच्या आमच्या हालचाली सुरू आहेत. पुढील वर्षी जून महिन्याच्या अखेरीस ‘अंजू बॉबी जॉर्ज अकादमी’ किंवा ‘अंजू बॉबी जम्प अस’ या नावाने अकादमी स्थापन केली जाईल. बंगळुरूच्या साई केंद्रात ही अकादमी सुरू करण्यात येईल. स्वत: जागा विकत घेऊन अकादमी स्थापण्याचा आम्ही खटाटोप केला नाही. सुरुवातीला युवा खेळाडूंमधून गुणी खेळाडूंची निवड या अकादमीसाठी केली जाईल. त्यानंतर १६ आणि १८ वर्षांखालील खेळाडूंना या अकादमीत मोफत सराव करता येईल. त्यातूनच देशाला अव्वल लांब उडीपटू मिळतील, अशी आशा आहे.

या अकादमीसाठी प्रशिक्षक नेमण्याचा विचार आहे का?
सध्या तरी बाहेरील प्रशिक्षक नेमण्याविषयी विचार केलेला नाही. माझे पती स्वत: तिहेरी उडीत राष्ट्रीय विजेते असल्यामुळे त्यांच्यासोबत मी या अकादमीचा कार्यभार सांभाळणार आहे. मात्र गरज लागल्यास बाहेरूनही प्रशिक्षक नेमण्याची आमची तयारी असेल. अनेक पुरस्कर्त्यांनी अकादमीसाठी मदतीचा हात पुढे केला असून खेळाडूंना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहील.