कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळविण्यासाठी भारतीय फलंदाजांवर आमच्या गोलंदाजांनी दडपण आणण्याची आवश्यकता आहे आणि हेच आमच्यापुढील मोठे आव्हान असेल, असे न्यूझीलंडचा गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने सांगितले.
‘‘एकदिवसीय सामन्यांमध्ये आम्ही विजय मिळविला असला, तरी कसोटी सामन्यांमध्ये भारतीय फलंदाज आक्रमक खेळ करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच आमच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांचा बचाव उखडून टाकण्याची आवश्यकता आहे. फटकेबाजी करताना भारतीय फलंदाजांकडून कशा चुका होतील असा दृष्टिकोन ठेवीत गोलंदाजी करण्याची आमच्यावर जबाबदारी आहे,’’ असे बोल्ट म्हणाला.
बोल्ट याने पुढे सांगितले, एकदिवसीय सामने व कसोटी सामने यामध्ये बराच फरक असला, तरी खेळाच्या तंत्रात फारसा बदल होत नाही. जर आमच्या गोलंदाजांनी दिशा व टप्पा यावर नियंत्रण राखले, तर भारतीय फलंदाजांना फटकेबाजी करताना खूप अडचण येण्याची शक्यता आहे. भारत व न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीला ६ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.