20 November 2017

News Flash

विजय असो!

कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर ‘डेंजर वारा’ सुटलाय. सूर्याने बुधवारी सकाळपासून जरी दर्शन दिले नसले तरी

प्रशांत केणी, कोलकाता | Updated: January 3, 2013 4:50 AM

कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर ‘डेंजर वारा’ सुटलाय. सूर्याने बुधवारी सकाळपासून जरी दर्शन दिले नसले तरी भारत-पाकिस्तान सामन्याची तणावग्रस्त शांतता वातावरणाचे गांभीर्य आणखी वाढवत होती. ईडन गार्डन्सवर पाकिस्तानविरुद्ध अद्याप एकदाही एकदिवसीय सामन्यात विजय न मिळाल्याचा भूतकाळ पाकिस्तानच्या पाठीशी आहे. याचप्रमाणे चेन्नईच्या चेपॉकवर पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून पाकिस्तानचा संघ मालिका विजयाच्या ईष्रेनेच कोलकात्यामध्ये आला आहे. ‘दडपण मोठे असले तरी हा सामना आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे,’ या भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या भावना बोलक्या आहेत. भारतीय भूमीवर इंग्लिश संघाकडून पत्करलेल्या कसोटी मालिकेतील पराभवाच्या कटू स्मृती अजूनही ताज्या आहेत. भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी चेन्नईत जुनैद खानच्या वेगवान माऱ्यासमोर शरणागती पत्करली होती. याचप्रमाणे सलामीवीरांचे अपयश, गोलंदाजांसमोरील दुखापतींचे आव्हान, सातवा फलंदाज खेळवून कामचलावू गोलंदाजानिशी पाचव्या नियमित गोलंदाजाला टाळण्याची योजना, आयसीसीचे नवे नियम या साऱ्या आव्हानांची जंत्री भारतीय संघासमोर आहे. पण ‘नवा सामना ही सुरुवात’ मानणाऱ्या धोनीचा कोलकात्याची लढाई जिंकून मालिकेत परतण्याचा निर्धार पक्का आहे.
सचिन तेंडुलकरच्या अनुपस्थितीत प्रथमच पाकिस्तानसारख्या तगडय़ा प्रतिस्पध्र्याशी मैदान-ए-जंगमध्ये उतरणाऱ्या भारताला चेन्नईत चांगली सलामी देण्यात अपयश आले. वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, विराट कोहली, रोहित शर्मा आणि युवराज सिंग या भारताच्या पाच आघाडीच्या फलंदाजांना जुनैद आणि मोहम्मद इरफान जोडीने फक्त २९ धावांत तंबूची वाट दाखवली होती. त्यानंतर धोनीने सुरेश रैना आणि आर. अश्विनच्या साथीने जिद्दीने किल्ला लढविला होता. सलामीवीर सेहवागकडून भारताला मोठय़ा अपेक्षा आहेत. पण डिसेंबर २०११मध्ये २१९ धावांची विश्वविक्रमी खेळी साकारणारा हा बिनधास्त फलंदाज २०१२मध्ये मात्र धावांसाठी झगडताना आढळला. मागील वर्षभरातील १० एकदिवसीय सामन्यांत सेहवागला फक्त २१७ धावाच काढता आल्या आहेत. कोलकात्याच्या सामन्यासाठी संघात कोणतेही बदल होणार नसल्याचे भारतीय संघ व्यवस्थापनाकडून जरी संकेत मिळत असले, तरी अष्टपैलू रवींद्र जडेजाला खेळविण्याची चिन्हे दिसत आहेत. चेन्नईच्या सामन्यात भारताने युवराज, रैना आणि कोहली या कामचलावू गोलंदाजांनिशी पाचव्या नियमित गोलंदाजाचा १० षटकांचा कोटा पूर्ण केला. पण या षटकांत पाकिस्तानी फलंदाजांनी ७७ धावा चोपल्या
होत्या. पाकिस्तानचा संघ त्या तुलनेत अधिक निश्चिंत आहे. जुनैद, इरफान आणि उमर गुल यांचा वेगवान मारा, त्याचप्रमाणे नासिर जमशेद, अनुभवी युनूस खान आणि शोएब मलिक यांचा फॉर्म हे सारे काही पाकिस्तानसाठी अनुकूल आहे. त्यामुळे ईडनची लढाई जिंकून मालिकेवर प्रभुत्व मिळविण्याचे पाकिस्तानचा कप्तान मिसबाह उल हकचे मनसुबे आहेत.
पाकिस्तानी संघाने कोलकात्यामध्ये दोन्ही दिवस सराव केला, परंतु चेन्नईच्या एकदिवसीय सामन्यानंतर भारतीय संघ विसावला आणि मंगळवारी संपूर्ण संघ कोलकात्यात दाखल होईपर्यंत सायंकाळ झाली. त्यामुळे भारतीय संघ मंगळवारी सराव करू शकला नाही. पण बुधवारी भारतीय संघाने कसून सराव केला. ईडन गार्डन्सवरील ही लढत जिंकून नव्या वर्षांची चांगली सुरुवात करण्याचे ध्येय भारतीय संघाने बाळगले आहे.
भारताला गरज दुसऱ्या सचिनची -हक
सचिन तेंडुलकरसारख्या महान फलंदाजाची भारताला उणीव भासणे स्वाभाविक आहे. त्यामुळे भारताला सचिनची जागा घेऊ शकणाऱ्या फलंदाजाची नितांत आवश्यकता आहे, असे मत पाकिस्तानचा कप्तान मिसबाह उल हकने व्यक्त केले.तो पुढे म्हणाला की, ‘‘भारत-पाकिस्तान यांच्यात नेहमीच मालिका रंगतदार झाल्या आहेत. या मालिकेसाठी आम्ही विशेष योजना आखून भारतात आलो आहोत. त्यामुळे मालिकाजिंकण्यासाठी आणि चांगल्या क्रिकेटसाठी आम्ही उत्सुक आहोत.’’‘‘जुनैद खान आणि मोहम्मद इरफान यांच्यासारख्या नव्या वेगवान गोलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजीची धुरा सांभाळली आहे. त्यामुळे पाकिस्तानचे भवितव्य उज्ज्वल आहे,’’ असे हकने सांगितले.
पावसाचे सावट
कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणाऱ्या ऐतिहासिक रौप्यमहोत्सवी सामन्याची क्रिकेटरसिकांना मोठी उत्सुकता आहे. पण कोलकाता वेधशाळेने गुरुवारी पावसाचा इशारा दिल्यामुळे ही उत्कंठा पावसाच्या पाण्यात वाहून जाण्याची शक्यता आहे. बुधवारी सकाळपासून कोलकाता शहरात सूर्यदर्शन झाले नाही. त्यामुळे भारतीय संघाने दुपारी सरावही प्रकाशझोतात केला. हा सामना पाहण्यासाठी पाकिस्तानहून ३८६ क्रिकेटरसिकही आले आहेत.
धोनीचे पुन्हा ‘संक्रमणपुराण’!
‘संक्रमण’ या शब्दाशी भारताचा कप्तान महेंद्रसिंग धोनीचे ऋणानुबंधाचे नाते आहे. ईडन गार्डन्सवर होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या पूर्वसंध्येलाही याच संक्रमणाविषयी धोनीने विश्लेषण केले. ‘‘भारतीय क्रिकेट संघ संक्रमण अवस्थेतून जात आहे. आपले अनेक गोलंदाज दुखापतींशी झुंजत आहेत. नव्या नियमांचे आव्हान कठीण आहे. भारतीय फलंदाजांकडूनही अपेक्षित धावा होत नाहीत, परंतु नव्या सामन्यात आम्ही नव्याने प्रारंभ करू,’’ असे मत धोनीने व्यक्त केले.‘‘नव्या नियमांनिशी आम्ही अद्याप एकच सामना खेळलो आहोत. त्यामुळे त्यांचा योग्य अंदाज आम्ही घेऊ’’, असे एकदिवसीय क्रिकेटमधील आयसीसीच्या नव्या नियमांच्या आव्हानाबाबत धोनी म्हणाला. याचप्रमाणे गुरुवारच्या सामन्यासाठी विराट कोहली तंदुरुस्त असल्याची ग्वाही धोनीने दिली.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, युवराज सिंग, सुरेश रैना, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन, अशोक िदडा, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा.
पाकिस्तान : मिसबाह उल हक (कर्णधार), नासिर जमशेद, इम्रान फरहात, महंमद हफीझ, उमर अकमल, युनूस खान, कामरान अकमल, वहाब रियाझ, उमर गुल, अन्वर अली, सईद अजमल, हरीस सोहेल, जुनेद अली, अजहर अली, झुल्फिकार बाबर.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स, स्टार क्रिकेट आणि स्टार क्रिकेट एचडी.
सामन्याची वेळ : दुपारी १२ वाजल्यापासून.
बीसीसीआयने खाजगी अकादमींना मान्यता द्यावी- कपिल
कोलकाता : खाजगी क्रिकेट अकादमींकडे पुरेशा पायाभूत सुविधा आहेत, त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या अकदमींना मान्यता द्यावी, असे मत भारताचा माजी विश्वविजेता कर्णधार कपिल देव याने व्यक्त केले.
दहा वर्षांपूर्वी खाजगी क्रिकेट अकादमींना मान्यता द्यावी, असे मी बीसीसीआयला सांगितले होते. बीसीसीआयने त्यांना मान्यता दिली, तर नक्कीच या अकादमींमधून गुणवान खेळाडू देशाला मिळतील, असे कपिल यांनी सांगितले.

First Published on January 3, 2013 4:50 am

Web Title: will to win