टाटा स्टील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतील चॅलेंजर विभागात विजेतेपद मिळवल्याचा खूप आनंद झाला आहे. भविष्यात विश्वविजेतेपद मिळवण्यासाठी आतापासूनच कसोशीने प्रयत्न करणार आहे, असे भारताचा ग्रँडमास्टर विदित गुजराथीने सांगितले. विदितने चॅलेंजर विभागात विजेतेपद मिळवताना पुढील वर्षीच्या मास्टर्स गटात खेळण्याची पात्रता पूर्ण केली आहे. मास्टर्स विभागात विश्वविजेता मॅग्नस कार्लसन, विश्वनाथन आनंद, व्लादिमीर क्रामनिक आदी अनेक नामवंत खेळाडूंचा समावेश आहे.
विजेतेपदाबाबत विदित म्हणाला, ‘‘चॅलेंजर विभागातही बलाढय़ खेळाडूंचा सहभाग होता. त्यामुळे अजिंक्यपद मिळवणे सोपी गोष्ट नव्हती. मी शेवटपर्यंत जिद्दीने खेळलो. हे विजेतेपद माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे परदेशातील अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भाग घेण्याची संधी मला मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय मानांकनात प्रगती करण्यासाठी अशा स्पर्धामधील सहभाग उपयुक्त ठरतो. त्याचप्रमाणे अनेक अनुभवी खेळाडूंबरोबर खेळण्याचा फायदा भावी कारकीर्दीसाठी होणार आहे.’’
विदित हा महाराष्ट्रातील नाशिकचा रहिवासी आहे. २३ वर्षीय विदितला टाटा स्टील स्पर्धेत बसीम अमीन (इजिप्त), मिशाल क्रॅसेन्कोव (पोलंड), अन्तोन कोरोबोव्ह (युक्रेन), जागतिक कनिष्ठ विजेता आर्यन तारी (नॉर्वे), जेफ्री झियांग (अमेरिका), जॉर्डन व्हान फोरेस्ट (नेदरलँड्स) यांचे आव्हान होते. विदितने तेरा फेऱ्यांमध्ये नऊ गुणांची कमाई करताना पाच डाव जिंकले व आठ डाव बरोबरीत सोडवले. शेवटपर्यंत त्याने अपराजित्व राखले. अकराव्या फेरीअखेर विदित व कोरोबोव्ह यांचे प्रत्येकी साडेसात गुण झाले होते. विदितने शेवटच्या दोन फे ऱ्यांमध्ये दीड गुण मिळवला. कोरोबोव्हला एका डावात पराभव स्वीकारावा लागला. त्याला दोन फे ऱ्यांमध्ये केवळ अर्धा गुण मिळवता आला. त्यामुळेच विदितने कोरोबोव्हला एक गुणाने मागे टाकून प्रथम स्थान घेतले. विदित जागतिक क्रमवारीत तिसाव्या स्थानावर आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 30, 2018 1:47 am