थायलंड व त्यापाठोपाठ इंडोनेशियामध्ये होणाऱ्या बॅडमिंटन ग्रां. प्रि. स्पर्धेत विजेतेपद मिळविन असा आत्मविश्वास भारताची ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती खेळाडू सायना नेहवाल हिने व्यक्त केला. दुखापतीमुळे तिला सुदीरमन चषक स्पर्धेत भाग घेता आला नव्हता. सायना हिला येथे एप्रिलमध्ये इंडिया ओपन स्पर्धेच्या वेळी दुखापत झाली होती. तिच्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्यामुळे तिने सुदीरमन स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता.
आता आपण पूर्णपणे तंदुरुस्त असून थायलंड व इंडोनेशियामध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी चांगली तयारी केली आहे असे सांगून सायना म्हणाली, डाव्या पायाची दुखापत पूर्णपणे बरी झाली आहे. मी या स्पर्धासाठी भरपूर सराव केला आहे. या स्पर्धामध्ये विजेतेपद राखण्याचे माझे ध्येय आहे. आता स्पर्धा खूप वाढली आहे. २००६ मध्ये फिलिपाईन्समधील स्पर्धेत मी विजेतेपद मिळविले, त्यावेळी जागतिक क्रमवारीत मला ८६ वे स्थान होते.
थायलंडमधील स्पर्धेसाठी सायनास अग्रमानांकन देण्यात आले आहे. इंडोनेशिया व सिंगापूरमधील स्पर्धेसाठी तिला दुसरे मानांकन मिळाले आहे.