न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन आणि श्रीलंकेचा जादुई फिरकीपटू अकिला धनंजया यांची गोलंदाजी संशयास्पद असल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मंगळवारी जाहीर केले.

विल्यम्सन व धनंजया दोघेही उजव्या हाताने ऑफ स्पिन गोलंदाजी करतात. श्रीलंकेतील गॉल स्टेडियमवर झालेल्या उभय संघांतील पहिल्या कसोटी सामन्यानंतर ‘आयसीसी’ने त्यांच्या गोलंदाजी शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे पुढील १४ दिवसांच्या आत या दोघांच्या गोलंदाजीची चाचणी घेतली जाईल. परंतु या चाचणीचा निकाल येईपर्यंत ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करू शकतात.

२९ वर्षीय विल्यम्सनने पहिल्या कसोटीत फक्त तीन षटके गोलंदाजी केली, तर २५ वर्षीय धनंजयाने ६२ षटके गोलंदाजी करताना सहा बळी मिळवले. उभय संघातील दुसऱ्या कसोटीला २२ ऑगस्टपासून सुरुवात होत असून या मालिकेत श्रीलंकेने १-० अशी आघाडी घेतली आहे.

विल्यम्सनला विश्रांती; साऊदीकडे नेतृत्व

कोलंबो : १ सप्टेंबरपासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडने कर्णधार केन विल्यम्सन आणि वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. विल्यम्सनच्या अनुपस्थितीत अनुभवी गोलंदाज टिम साऊदी न्यूझीलंडचे नेतृत्व सांभाळणार आहे.

न्यूझीलंडचा संघ : टिम साऊदी (कर्णधार), टॉड अ‍ॅस्टल, टॉम ब्रूस, टिम स्टेइफर्ट (यष्टीरक्षक), रॉस टेलर, मार्टिन गप्टिल, कॉलिन मुन्रो, कॉलिन डीग्रँडहोम, ईश सोधी, मिचेल सान्तनेर, डॅरेल मिचेल, लॉकी फर्ग्युसन.