केन विल्यमसन आणि ब्रॅडले वॉटलिंग यांनी सहाव्या विकेटसाठी रचलेल्या नाबाद ३६५ धावांच्या विश्वविक्रमी भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत शानदार पुनरागमन केले. आठ तासांहून अधिक काळ खेळपट्टीवर ठाण मांडणाऱ्या या भागादारीच्या बळावर न्यूझीलंडने दुसरा डाव ५ बाद ५२४ धावांवर घोषित केला आणि श्रीलंकेसमोर विजयासाठी ३९० धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले. विल्यमसनने १८ चौकारांसह २४२ धावांची खेळी करत कारकिर्दीतील पहिलेवहिले द्विशतक झळकावले. वॉटलिंगने ९ चौकार आणि एका षटकारासह १४२ धावा करताना चौथ्या शतकाची नोंद केली. ५ बाद १५९ अशा स्थितीत एकत्र आलेल्या या जोडीने सहाव्या विकेटसाठीच्या ब्रेंडन मॅक्क्युलम-ब्रॅडले वॉटलिंग यांचा ३५२ धावांचा विक्रम मोडला. सहाव्या विकेटसाठी तीनशेपेक्षा अधिक धावा भागीदाऱ्यांमध्ये सहभागी होण्याचा विक्रमही वॉटलिंगने नावावर केला.
चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेच्या १ बाद ४५ धावा झाल्या आहेत. विजयासाठी त्यांना ३४५ धावांची, तर न्यूझीलंडला ९ विकेट्सची आवश्यकता आहे.