केदार लेले यांनी लिहिलेले ‘विम्बल्डनच्या हिरवळी’वरून या मराठी पुस्तकास १२८ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या विम्बल्डनच्या संग्रहालयाने मान्यता दिली असून, हे पुस्तक विम्बल्डनच्या संग्रहालयात ठेवण्यात आले आहे. विविध आंतरराष्ट्रीय लेखकांच्या पंक्तीत विराजमान होण्याचा मान या मराठी पुस्तकास मिळाला आहे. या पुस्तकाला ‘लिम्का बुक ऑफ नॅशनल रेकॉर्ड्स २०१६’ने मान्यता देत सन्मानपत्रही प्रदान केले आहे.
डोंबिवलीमध्ये जन्मलेले केदार लेले गेली अनेक वर्षे लंडनमध्ये वास्तव्यास आहेत. या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी विम्बल्डन स्पर्धेचा इतिहास मराठीतून मांडला आहे. त्यामध्ये महत्त्वाचे खेळाडू, या स्पर्धेतील महत्त्वाच्या लढती, तसेच गाजलेल्या खेळाडूंबद्दलची विशेष माहिती अशा विविध गोष्टी रंजकपणे मांडलेल्या आहेत. क्रिकेट आणि फुटबॉल या खेळांइतकाच टेनिस हा सुद्धा प्रसिद्ध खेळ आहे. इंग्लंडने टेनिसची परंपरा जाणीवपूर्वक जपली आहे. विम्बल्डन स्पर्धेला गौरवशाली परंपरा आहे. चारही ग्रॅंडस्लॅम स्पर्धांमध्ये विम्बल्डनचे स्थान अग्रणी आहे. अशा या टेनिसपंढरीबद्दल खूप बारकाईने या पुस्तकात माहिती देण्यात आली आहे.