काही दिवसांपूर्वीच फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या जेतेपद पटकावणाऱ्या गार्बिन म्युगुरुझाला विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पराभवाला सामोरे जावे लागले. स्वित्र्झलडची युवा खेळाडू बेलिंडा बेनकिकने दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. अन्य लढतीत सिमोन हालेप, व्हीनस विल्यम्स यांनी विजयी आगेकूच केली.

जागतिक क्रमवारीत १२४व्या स्थानी असलेल्या स्लोव्हाकियाच्या जॅना सेप्लोव्हाने द्वितीय मानांकित गार्बिनवर ६-३, ६-२ असा विजय मिळवला. २२ वर्षीय गार्बिनने काही दिवसांपूर्वीच फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. गेल्यावर्षी विम्बल्डन स्पर्धेत गार्बिनला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यंदा ही कामगिरी सुधारण्याची संधी गार्बिनकडे होती. फ्रेंच स्पर्धेच्या जेतेपदासह गार्बिनने सूर गवसल्याचे संकेतही दिले होते. मात्र विम्बल्डन जेतेपदाचे तिचे स्वप्न अपूर्णच राहिले आहे.

सातवी मानांकित बेनकिक दुसऱ्या फेरीच्या लढतीत अमेरिकेच्या ज्युलिया बोसरुपविरुद्ध ६-४, १-० अशी आघाडीवर होती. मात्र खांद्याच्या दुखापतीमुळे तिला माघार घ्यावी लागली. महिला टेनिस जगतातील प्रतिभाशाली खेळाडूंमध्ये १९ वर्षीय बेनकिकचा समावेश होतो.

रोमानियाच्या सिमोन हालेपने इटलीच्या अनुभवी फ्रान्सेस्का शियोव्हेनचा ६-१, ६-१ असा धुव्वा उडवत विम्बल्डन टेनिस स्पर्धेत तिसरी फेरी गाठली. पाचव्या मानांकित सिमोनने ताकदवान फोरहँडचे फटके आणि सर्वागीण वावराच्या जोरावर विजय साकारला. पावसामुळे तीन दिवसांनंतर पूर्ण झालेल्या लढतीत जर्मनीच्या अनिका बेकने हिदर वॉटसनवर ३-६, ६-०, १२-१० अशी मात केली. व्हीनस विल्यम्सने मारिया सकारीचा ७-५, ४-६, ६-३ असा पराभव केला. अ‍ॅलिझ कॉर्नेटने सारा इराणीवर ७-६ (७-४), ७-५ असा विजय मिळवला. डॅनिएल इव्हान्सने अ‍ॅलेक्झांडर डोलगोपोव्हचा ७-६ (८-६), ६-४, ६-१ असा पराभव केला. तिमेआ बॅसिनझस्कीने ल्युकसिका कुमखुमवर ६-४, ६-२ अशी मात केली. पुरुषांमध्ये मिलास राओनिकने आंद्रेआ सेप्पीला ७-६ (५), ६-४, ६-२ असे नमवले. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या केई निशिकोरीने ज्युलियन बेनाटूवर ४-६, ६-४, ६-४, ६-२ अशी मात केली. पुढच्या फेरीत त्याच्यासमोर आंद्रेय कुझनेत्सोव्हचे आव्हान असणार आहे