Wimbledon 2018 Men’s Final : प्रतिष्ठेच्या विम्बल्डन स्पर्धेत आज झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने आफ्रिकेच्या केविन अँडरसन याला ६-२, ६-२, ७-६ (७-३) असे पराभूत केले. उपांत्यपूर्व फेरीत फेडररसारख्या दिग्गज टेनिसपटूला पराभूत केल्यामुळे केविन अँडरसन या सामन्यात कडवी झुंज देईल, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र हा सामना एकतर्फी झाला. जोकोव्हिचने कारकिर्दीतील १३वे ग्रँडस्लॅम विजेतेपद तर या स्पर्धेचे ४थे विजेतेपद पटकावले.

सामन्यावर जोकोव्हिचचे सुरुवातीपासूनच वर्चस्व दिसून आले. पहिले ३ गेम जोकोव्हिचने जिंकले. त्यानंतर अँडरसनने १ गेम जिंकत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण जोकोव्हिचच्या अनुभवापुढे त्याचा निभाव लागला नाही. पहिला गेम जोकोव्हिचने ६-२ असा सहज जिंकला. दुसऱ्या सेटची सुरुवातही जोकोव्हिचच्या विजयानेच झाली. तो ४-१ असा आघाडीवर असताना अँडरसनने पुन्हा एकदा पुनरागमन करत दुसरा गेम जिंकला. पण त्यापुढील गेम आपल्या नवे करत जोकोव्हिचने दुसरा सेट खिशात घातला. तिसऱ्या आणि अंतिम सेटमध्ये जोकोव्हिचने अँडरसनला टायब्रेकरमध्ये पराभूत केले आणि सामना नावावर केला.

जोकोव्हिचने विम्बल्डनच्या उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात द्वितीय मानांकित राफेल नदालचा ६-४, ३-६, ७-६ (११-९), ३-६, १०-८ असा पराभव केला होता. या सामना दोन दिवस खेळवण्यात आला होता. पहिल्या दिवशी सुरू झालेल्या सामन्यात जोकोव्हिचने ३ पैकी २ सेट जिंकून आघाडी घेतली होती. मात्र कर्फ्यु टाइममुळे हा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे ३.३० वाजता थांबवण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उर्वरित सामना खेळवण्यात आला. सामन्याच्या चौथ्या सेटमध्ये नदालने आपला अनुभव पणाला लावून तो सेट जिंकला आणि सामन्यात बरोबरी राखली. मात्र पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये नदालला आपली जादू कायम राखता आली नाही. लांबलेला पाचवा सेट जोकोव्हिचने १०-८ अशा फरकाने आपल्या नावे केला होता.