कर्बर, ओस्तापेन्को उपांत्यपूर्व फेरीत

विम्बल्डन : गतविजेता रॉजर फेडरर, सेरेना विल्यम्स, माजी ग्रँडस्लॅम विजेती अँजेलिक कर्बर व गतवेळची फ्रेंच विजेती येलेना ओस्तापेन्को यांनी चतुरस्र खेळाचा प्रत्यय घडवत विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीकडे वाटचाल केली.

कारकीर्दीमध्ये नवव्यांदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी उत्सुक असलेल्या फेडररने फ्रान्सच्या आद्रियन मॅनारिनोचा ६-०, ७-५, ६-४ असा पराभव केला. त्याने आपल्या नावलौकिकास साजेसा खेळ करताना फोरहँडचे फटके व बॅकहँड प्लेसिंग याचा सुरेख प्रत्यय घडवला. जपानच्या केई निशिकोरीने अपराजित्व राखताना अर्नेस्ट गुल्बिसला रोमहर्षक लढतीनंतर ६-४, ७-६ (७-५), ७-६ (१२-१०), ६-१ असे पराभूत केले.

सेरेनाने रोडिना एवगेनियाचा ६-२, ६-२ असा धुव्वा उडवला. कर्बरने बेलिंडा बेन्किकला तर लाटवियाच्या ओस्तापेन्कोने बेलारूसच्या अ‍ॅलेसांड्रा सास्नोविचला पराभूत केले. सिमोना हॅलेपला पराभूत करणाऱ्या चीन तैपेईच्या सूवेई हेसिहची अनपेक्षित विजयाची मालिका खंडित झाली. तिला डॉमिनिका सिबुलकोवाने तिचा ६-४, ६-१ असा सरळ सेट्समध्ये पराभव केला. २०व्या मानांकित किकी बर्टन्सने सातव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोवाची घोडदौड ६-३, ७-६ (७-१) अशी रोखली.