विम्बलडन स्पर्धेच्या महिला एकेरी सामन्यात अग्रमानांकित बार्टीने बाजी मारली. चेक प्रजासत्ताकची कॅरोलिना प्लिस्कोव्हा हिला ६-३,६(४)- ७ (७), ६-३ ने पराभूत करत चषक आपल्या नावावर केला. बार्टीने पहिल्यांदाच विम्बलडन स्पर्धा जिंकली आहे. यापूर्वी बार्टीने २०१८ मध्ये फ्रेंच खुल्या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं. तसेच इव्होनी कावलीनंतर विम्बलडनचं जेतेपद पटकावणारी ऑस्ट्रेलियाची दुसरी महिला टेनिसपटू ठरली आहे. ४१ वर्षानंतर ऑस्ट्रेलियानं महिला एकेरीत विजय प्रस्थापित केला आहे. दोन्ही खेळाडू पहिल्यांदा विम्बलडन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचले होते. पहिल्या सेटमध्ये दमदार खेळ करणाऱ्या बार्टीला दुसऱ्या सेटमध्ये प्लिस्कोव्हाने चांगलाच घाम फोडला आणि ट्रायब्रेकरमध्ये विजय मिळवला. मात्र तिसऱ्या सेटमध्ये बार्टीने जोरदार कमबॅक करत प्लिस्कोव्हाला पराभूत केलं.

बार्टीने यंदाच्या मोसमात सातत्यपूर्ण कामगिरी करत तीन जेतेपदे पटकावली असून माद्रिद खुल्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. मात्र दुखापतीमुळे तिला इटालियन खुल्या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतून माघार घ्यावी लागली होती. तसेच फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेतही दुखापतीमुळे तिला दुसऱ्या फेरीचा सामना अर्धवट सोडावा लागला होता.

प्लिस्कोव्हाला मात्र हिरवळीवर चांगली कामगिरी करता आली नाही. यंदाच्या मोसमात सूर मिळवण्यासाठी झगडणाऱ्या प्लिस्कोव्हाने आर्यना सबालेंकावर मात करत विम्बल्डनच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. दोघींमध्ये आतापर्यंत सात लढती झाल्या असून बार्टीने पाच सामन्यांत विजय मिळवला आहे.