जगभरात पसरलेल्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका आता विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेलाही बसला आहे. टेनिस जगतात मानाची स्पर्धा मानली जाणारी ही स्पर्धा दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच रद्द करण्यात आलेली आहे. सध्याची खडतर परिस्थिती पाहता सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेतल्याचं स्पर्धेच्या आयोजकांनी स्पष्ट केलं आहे. २८ जुन ते ११ जुलै दरम्यान या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.

विम्बल्डन स्पर्धा रद्द झाल्यामुळे यंदाच्या हंगामात टेनिस प्रेमींना फक्त ३ ग्रँडस्लॅम स्पर्धांची मजा अनुभवता येणार आहे. दरम्यान अमेरिकन ओपन आणि फ्रेंच ओपन या दोन महत्वाच्या स्पर्धांमध्ये केवळ एक आठवड्याचा कालावधी आहे. १३ सप्टेंबरला अमेरिकन ओपन स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येईल, यानंतर आठवड्याभरात प्रेंच ओपनचं आयोजन होणार आहे. सध्या जगभरातील सर्व देशांत करोना विषाणूची लागण झालेली आहे. त्यामुळे अनेक क्रीडा संघटनांनी आपल्या महत्वाच्या स्पर्धा रद्द केल्या आहेत. युरोपला करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे, त्यामुळे स्पर्धकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विम्बल्डन स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.