विम्बल्डन जेतेपदाला गवसणी घातल्यानंतर काही आठवडय़ांनी मारियन बाटरेलीने आंतरराष्ट्रीय टेनिसमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर करत सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. दुखापतींचा ससेमिरा मागे लागल्यामुळे सिनसिनाटी मास्टर्स स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत रोमानियाच्या सिमोना हलेप हिच्याकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागल्यानंतर लगेचच बाटरेलीने निवृत्तीची घोषणा केली.
‘‘माझी निवृत्तीची आणि कारकीर्द संपवण्याची वेळ जवळ आली होती. हीच योग्य वेळ असल्याने मी निवृत्तीचा निर्णय घेतला,’’ असे बाटरेलीने सांगितले. फ्रान्सच्या बाटरेलीला हलेपकडून ६-३, ४-६, १-६ असा पराभव पत्करावा लागला. न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या अमेरिकन ग्रँड स्लॅम स्पर्धेला दोन आठवडे बाकी असताना बाटरेलीने निवृत्ती जाहीर केली आहे.
ती म्हणाली, ‘‘विम्बल्डनच्या जेतेपदामुळे मी कारकिर्दीच्या शिखरावर पोहोचले होते. बराच काळ मी टेनिस खेळत असल्यामुळे त्याचा अतिरिक्त ताण माझ्या शरीरावर पडत होता. विम्बल्डनमुळे मला माझे स्वप्न सत्यात उतरवता आले. पण त्यासाठी मी मर्यादेच्या पलीकडे त्रास सहन करत आले. या मोसमाच्या सुरुवातीला मला अनेक वेळा दुखापतींनी घेरले. विम्बल्डन जेतेपदाचा आनंद कायम माझ्यासोबत असणार आहे. पण शरीर साथ देत नसल्यामुळे मी टेनिसला अलविदा करण्याचा निर्णय घेतला.’’
गेल्या काही वर्षांपासून अनेक वेळा दुखापतींनी बाटरेलीचा पिच्छा पुरविला. विम्बल्डन जेतेपदानंतर ती फक्त तीन स्पर्धामध्ये खेळली. जुलै महिन्यात तिने हार्ड कोर्टवरील अनेक स्पर्धामधून माघार घेतली होती. ‘‘प्रत्येक सामन्यात ४५ मिनिटे खेळू लागल्यानंतर मला वेदना व्हायच्या. पण त्या सहन करून मी खेळत असायचे. यापुढे हा ताण सहन करण्यापलीकडे गेला होता,’’ असेही तिने सांगितले.

एकेरीतील कारकीर्द
क्रमवारीतील स्थान : ७ वे
विजय-पराभव : ४८९-२९७
जेतेपदे : डब्ल्यूटीए-८, आयटीएफ-६

ग्रँड स्लॅममधील कामगिरी
ऑस्ट्रेलियन : उपांत्यपूर्व फेरी (२००९)
फ्रेंच : उपांत्य फेरी (२०११)
विम्बल्डन : जेतेपद (२०१३)
अमेरिकन : उपांत्यपूर्व फेरी (२०१२)

दुहेरीतील कामगिरी
विजय-पराभव : ११७-८२
जेतेपदे : डब्ल्यूटीए-३, आयटीएफ-१
क्रमवारीतील स्थान : १५वे

ग्रँड स्लॅममधील कारकीर्द
ऑस्ट्रेलियन : तिसरी फेरी (२००४, २००५)
फ्रेंच : तिसरी फेरी (२००५, २००६)
विम्बल्डन : उपांत्यपूर्व फेरी (२००४)
अमेरिकन : उपांत्य फेरी (२००३)