नोव्हाक जोकोव्हिच आणि अँडी मरे हे विम्बल्डन ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या जेतेपदापासून दोन विजय दूर आहेत. आता या दोघांना उपांत्य फेरीचा महत्त्वपूर्ण अडथळा पार करायचा आहे. सामन्यादरम्यान झालेल्या गुडघ्याच्या गंभीर दुखापतीतून सावरत अर्जेटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोट्रोसमोर जोकोव्हिचसारख्या तगडय़ा प्रतिस्पध्र्याचे आव्हान आहे. फेडरर, नदाल, जोकोव्हिच या दिग्गज त्रिकूटाची सद्दी मोडून काढत २००९मध्ये डेल पोट्रोने अमेरिकन खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. या तिघांपैकी आव्हान जिवंत असलेल्या जोकोव्हिचला नमवत इतिहास घडवण्याची डेल पोट्रोला संधी आहे. दुसऱ्या लढतीत मरेचा मुकाबला पोलंडच्या जेर्झी जान्कोविझशी होणार आहे. ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम चार जणांमध्ये धडक मारणारा जान्कोविझ पोलंडचा पहिला पुरुष टेनिसपटू ठरला आहे. अनुभवाच्या बाबतीत जान्कोविझचे पारडे कमकुवत आहे.
पेस, बोपण्णाचे पुरुष दुहेरीतील आव्हान संपुष्टात
अमेरिकेच्या अनुभवी माइक आणि बॉब ब्रायन जोडीने पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत रोहन बोपण्णा-व्ॉसेलिन जोडीचे आव्हान ६-७, ६-४, ६-३, ५-७, ६-३ असे संपुष्टात आणले. दुसऱ्या लढतीत क्रोएशियाच्या इव्हान डॉडिग आणि ब्राझिलच्या मार्सेलो मेलो जोडीने भारताच्या लिएण्डर पेस आणि चेक प्रजासत्ताकच्या राडेक स्टेपानेकला ३-६, ६-४, ६-१, ३-६, ६-३ असे नमवले. मिश्र दुहेरीत सानिया मिर्झा आणि रोमानियाच्या होरिआ टेकाऊ यांना पराभवाला सामोरे जावे लागले.