दोन ते तीन दिवस रंगणारे सामने निकाली काढण्यासाठी आता ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लबने विम्बल्डनमध्ये पाचव्या सेटनंतर टाय-ब्रेकचा अवलंब करण्याचे ठरवले आहे. पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये १२-१२ अशी स्थिती झाल्यानंतर टाय-ब्रेकचा वापर करण्यात येईल. पुढच्या वर्षीपासून या पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.

‘‘निर्णायक सेटमध्ये ठरावीक कालावधीनंतरही सामन्याचे निकाल लागत नाहीत. त्यामुळेच या सर्वाचा विचार करून आम्ही सर्व सामन्यांसाठी टाय-ब्रेक पद्धत सादर करण्याचा निर्णय घेतला,’’ असे क्लबचे अध्यक्ष फिलीप ब्रूक यांनी सांगितले.

निर्णायक सेट ६-६ अशा स्थितीत असताना टाय-ब्रेकचा अवलंब केला जातो. पण दोन्ही खेळाडूंनाजिंकण्याची समान संधी मिळावी, यासाठी विम्बल्डनमध्ये १२-१२ अशा गुणांनंतर ही पद्धत लागू केली जाणार आहे.

यावर्षीच्या विम्बल्डनमध्ये, जॉन इस्नेर आणि केव्हिन अँडरसन यांच्यात झालेली पुरुषांच्या उपांत्य फेरीची लढत जवळपास दोन दिवस रंगली होती. साडेसहा तासाच्या लढतीनंतर अखेर २६-२४ अशा गुणफरकाने अँडरसनने हा सामनाजिंकला होता. नोव्हाक जोकोव्हिच आणि राफेल नदाल यांच्यातील उपांत्य फेरीची लढतही दोन दिवस चालली होती. विम्बल्डनमधील प्रदीर्घ काळ रंगलेला सामनाही अमेरिकेच्या इस्नेरच्या नावावर आहे. २०१० मध्ये जवळपास तीन दिवस रंगलेला हा सामना फ्रान्सच्या निकोलस माहूतने ७०-६८ अशा गुणफरकानेजिंकला होता.

‘‘विम्बल्डनमधील गेल्या २० वर्षांतील निकालांचा अभ्यास केल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला आहे. सामना लांबण्याचे प्रकार फारच कमी वेळा घडतात. पण दोन्ही खेळाडूंना सामनाजिंकण्याची समान संधी मिळावी आणि एका ठरावीक वेळेत सामना संपावा, यासाठी आम्ही १२-१२ अशा स्थितीतनंतर टाय-ब्रेकचा अवलंब करण्याचे ठरवले आहे,’’ असेही ब्रूक यांनी सांगितले.