महिला एकेरीतील जेतेपदाची कडवी दावेदार मानली जाणाऱ्या सेरेना विल्यम्सने दुखापतीमुळे विल्बल्डन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेतून माघार घेतली. हा निर्णय घेताना डावा हात सरसावत तिने आपले अश्रू रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु ती रोखू शकली नाही. कोर्टवरील टेनिसरसिकांनी तिला उभे राहून अभिवादन करीत निरोप दिला.

विम्बल्डनमध्ये मंगळवारी पहिल्या फेरीच्या सामन्यातील पहिला सेटला प्रारंभ झाला, तेव्हा सेरेनासमोर मार्गारेट कोर्टच्या २४ ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या विक्रमाची बरोबरी हेच लक्ष्य होते. तिने जिंकलेल्या २३ ग्रँडस्लॅमपैकी सात जेतेपदे ही विम्बल्डनच्या हिरवळीवरचीच. परंतु जागतिक क्रमवारीत १००व्या क्रमांकावर असलेल्या बेलारूसच्या अलिक्सँड्रा सॅसनॉविचविरुद्ध ३-३ अशी पहिल्या सेटमध्ये स्थिती असताना बेसलाइनपाशी सेरेनाचा उजवा पाय घसरल्यामुळे दुखावला. पण तिने त्वरेने सावरण्याचा प्रयत्न केला. पण यापुढे खेळणे कठीण असल्याचे तिला लक्षात आले.

मग गुडघ्यावर टेकून विम्बल्डनच्या हिरवळीवर माथा ठेवत ती ओक्साबोक्शी रडू लागली. मग उजव्या हातातील रॅकेट जमिनीवर टेकत तिने हात उंचावत प्रेक्षकांच्या अभिवादनाचा स्वीकार केला.

सेंटर कोर्टवरील सामन्यासाठी सेरेना उतरली, तेव्हाच तिच्या उजव्या पायावर अनेक पट्ट्या लावल्याचे दिसत होते. मग  ३-१ अशी आघाडीवर असताना सेरेनाचा डावा पाय दुखावला. मग वैद्यकीय स्थगिती घेत सेरेनाने सरावतज्ज्ञासह जाऊन उपघार घेतले. तिने सामना पूर्ण करण्याच्या इराद्याने अथक प्रयत्न केले. टेनिसरसिकांचाही तिला पाठिंबा होता. पण अमेरिकेच्या ३९ वर्षीय टेनिससम्राज्ञीला हा सामना अधुराच सोडावा लागला. खुर्चीवरील सामनाधिकारीसुद्धा खाली उतरले आणि त्यांनी साश्रूनयनांनी मैदान सोडणाऱ्या सेरेनाला साहाय्य केले.

गतविजेती सिमोना हॅलेप आणि चार वेळा ग्रँडस्लॅम विजेत्या नाओमी ओसाकाने स्पर्धेआधीच न खेळण्याचा निर्णय घेतल्यानंतर सेरेनाच्या माघारीमुळे यंदाचे विम्बल्डन जेतेपद कोण जिंकणार, ही उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

आपणास हे ठाऊक आहे का?
’ सेरेनाला आपल्या झळाळत्या टेनिस कारकीर्दीतील ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये दुसºयांदा सामना अर्धवट सोडावा लागला. याआधी १९९८ मध्ये तिला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती.
’ ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये दुसºयांदा सेरेनाचे पहिल्याच फेरीत आव्हान संपुष्टात आले. याआधी २०१२च्या फे्रंच खुल्या स्पर्धेत व्हर्जिनी रॅझानोने तिला सलामीलाच गारद केले होते.

सामन्यातून माघार घेण्याचा क्षण माझ्यासाठी अत्यंत भावनिक होता, पण कोर्टवरील प्रेक्षकांचे पाठबळ आत्मविश्वास उंचावणारे होते.    – सेरेना विल्यम्स

अरे देवा, माझा यावर विश्वासच बसत नाही.   – रॉजर फेडरर