देशभरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. बहुतांश सर्व देशांमध्ये सरकारने लॉकडाउनची घोषणा केली असून…अनेक क्रीडा स्पर्धांनाही याचा फटका बसला आहे. टेनिसमध्ये मानाचं स्थान असलेली विम्बल्डन स्पर्धा करोना विषाणूमुळे रद्द करण्यात आलेली आहे. तब्बल ७५ वर्षांनी पहिल्यांदाच ही स्पर्धा रद्द करण्यात आलेली आहे. मात्र ही स्पर्धा रद्द झाली असली तरीही विम्बल्डन आयोजकांना कोट्यवधींचा फायदा होणार आहे. विम्बल्डन स्पर्धेचे आयोजन गेल्या १७ वर्षांपासून जागतिक महामारीविरोधात विम्याची रक्कम भरत आहेत. याचाच फायदा स्पर्धेच्या आयोजकांना आता होताना दिसतो आहे, स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार विम्बल्डनच्या आयोजकांना अंदाजे १ हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम विम्याच्या स्वरुपात मिळणार आहे.

२९ जुन ते १२ जुलै दरम्यान यंदाच्या हंगामातली विम्बल्डन स्पर्धा खेळवली जाणार होती. स्पर्धेचे आयोजक ऑल इंग्लंड क्लबतर्फे प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलं होतं, ज्यात यंदाच्या हंगामाची स्पर्धा रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली. दुसऱ्या महायुद्धानंतर विम्बल्डन स्पर्धा रद्द होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. आयपीएलप्रमाणे विम्बल्डनचं आयोजनही प्रेक्षकांविना करण्याची मागणी होत होती, मात्र खेळाडूंची सुरक्षा लक्षात घेता आयोजकांनी यंदाची स्पर्धा रद्द करण्याचं ठरवलं.

अवश्य वाचा – उद्याचा दिवस नक्कीच चांगला असेल ! व्हिडीओतून रॉजर फेडररचा वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सलाम

विम्बल्डन स्पर्धा रद्द झाल्यामुळे आयोजकांना यंदा २ हजार कोटींपेक्षा जास्त आर्थिक नुकसान होणार आहे. मात्र विम्याच्या रकमेमुळे यातलं थोडं नुकसान भरुन काढता येणार आहे. विम्बल्डन आयोजन समितीचे प्रमुख रिचर्ड लुईस यांनी दिलेल्या माहितीनुसार, विम्यातून मिळणाऱ्या रकमेने फारसा फरक पडणार नाही. मात्र काही वर्षांपूर्वी आम्ही हा विमा काढला होता, त्यामुळे सध्याच्या संकटकाळात काहीप्रमाणात आम्हाला हातभार मिळतो आहे. दरम्यान, यंदाच्या हंगामातली विम्बल्डन स्पर्धा रद्द झालेली असली तरीही फ्रेंच खुली स्पर्धा आणि क्ले कोर्ट हंगाम सप्टेंबरमध्ये होऊ शकेल, असा विश्वास व्यावसायिक टेनिस संघटनेचे (एटीपी) प्रमुख आंद्रेआ गॉडेन्झी यांनी व्यक्त केला.