News Flash

ओढ हिरवळीची

काहिली करणाऱ्या उन्हाळ्यावर उतारा असणाऱ्या पावसाच्या सरींसह जून महिना उजाडतो. शुष्क झालेल्या सृष्टीवर ओथंबलेल्या ढगातून टपोरे थेंब बरसतात आणि हिरवळीची रुजवात होते.

| June 28, 2015 06:07 am

काहिली करणाऱ्या उन्हाळ्यावर उतारा असणाऱ्या पावसाच्या सरींसह जून महिना उजाडतो. शुष्क झालेल्या सृष्टीवर ओथंबलेल्या ढगातून टपोरे थेंब बरसतात आणि हिरवळीची रुजवात होते. त्याच वेळी सातासमुद्रापलीकडच्या इंग्लंडमधल्या विम्बल्डन गावची हिरवळ जगभरातल्या टेनिसरसिकांना ओढ लावते. निमित्त असतं वर्षांतल्या तिसऱ्या आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेचं. काही k03स्पर्धा फक्त जिंकण्यासाठी नसतात. त्या वातावरणाची, परंपरेची अनुभूती घेणं जिंकण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं. विम्बल्डन हा जतनीय मांदियाळीतला ठेवा. नेत्रसुखद हिरवळ, शुभ्रवस्त्रांवृतातले खेळाडू, लालचुटूक स्ट्रॉबेरीचा आस्वाद घेत टेनिस पाहणारे दर्दी चाहते आणि या सगळ्याला भरून राहणारे शिष्टाचाराचे कोंदण.. हे सगळं दरवर्षीच असतं, पण प्रत्येक वर्षी हा अनुभव मनात आणखी साठवून घ्यावा असं प्रत्येक टेनिसपटूला आणि त्याच्या चाहत्यांना वाटतं. टेनिसविश्वातल्या या राजेशाही जगतावर आपलं प्रभुत्व असावं, जेतेपद पटकावणाऱ्यांची नावं असलेल्या पितळी पाटीवर आपल्या नावाची आद्याक्षरं उमटावीत, हे ध्येय उराशी बाळगून जगभरातले टेनिसपटू विम्बल्डन नगरीत एकत्र येतात आणि रंगते एस आणि सव्‍‌र्हिसची मैफल.
यंदा या मैफलीचं १२९वं वर्ष आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ७ टक्क्यांनी बक्षीस रक्कम वाढवण्यात आली आहे. विम्बल्डन संयोजकांनी आपला खजिना आणखी खुला करत या स्पर्धेसाठी तब्बल २ कोटी ६७ लाख ५० हजार युरो इतकी बक्षीस रक्कम देण्याचं निश्चित केलं आहे. परंपेरला वाढीव मानधनाची जोड मिळाल्याने जेतेपदासाठी चुरस वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच लाल मातीवर स्वित्र्झलडच्या स्टॅनिसलॉस वॉवरिन्काने प्रगल्भ संक्रमणाचे संकेत दिले होते. लाल मातीवरून चेंडूचा प्रवास हिरव्यागार गवतावर झाला आहे. हे स्थित्यंतर जाणून घेत जेतेपदापर्यंत पोहोचण्यासाठी वॉवरिन्काला खडतर मार्ग पार करावा लागणार आहे. लाल मातीवर अगदी थोडक्यात ग्रँडस्लॅम जेतेपदांचं वर्तुळ पूर्ण करण्याची नोव्हाक जोकोव्हिचची संधी हुकली होती. ते हिशेब चुकते करण्याचा जोकोव्हिचचा प्रयत्न असेल. गतविजेता आणि अव्वल मानांकित k01जोकोव्हिच जेतेपदाचा सोनेरी चषक आपल्याकडेच राखण्यासाठी आतुर आहे. आधुनिक टेनिसचे शिलेदार रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांना गतवैभव परत मिळवण्याची ही नामी संधी आहे. ग्रास कोर्टवर दिमाखदार आकडेवारी नावावर असणाऱ्या फेडररचा वारू आता नवखेही खेळाडूही रोखतात. विक्रमी १८व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या फेडररने अडीच वर्षांचा जेतेपदांचा दुष्काळ संपवणे नितांत गरजेचे आहे. अन्यथा खेळाचा आनंद लुटणारा मात्र जेतेपदापासून वंचित राहणारा दिग्गज या फेडररच्या नव्या ओळखीवर शिक्कामोर्तब होईल. प्रदीर्घ कालावधीनंतर लाल मातीवरचं राफेल नदालचं साम्राज्य संपुष्टात आलं. विम्बल्डनच्या कोर्टवर २०११नंतर नदालला उपांत्यपूर्व फेरीचाही टप्पा गाठता आलेला नाही. गेल्या वर्षी सलामीच्या लढतीतच नदालला गाशा गुंडाळावा लागला होता. नामुष्की ओढवणारे पराभव बाजूला सारत ग्रास कोर्टवर चमत्कार घडवण्याची धमक नदालमध्ये आहे, मात्र त्यासाठी त्याला शरीराची साथ मिळणे अत्यावश्यक आहे. तसं झालं तर जुन्या लढवय्या नदालला पाहण्याची सुवर्णसंधी टेनिसरसिकांना मिळू शकते. घरच्या मैदानावर, चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा लाभलेल्या अँडी मरेला जेतेपदावर नाव कोरण्याची संधी आहे. अ‍ॅमेली मॉरेस्मोच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या मरेने २०१३मध्ये त्रिकुटाची सद्दी मोडत पहिलेवहिले ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले. मात्र त्यानंतर त्याला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. महत्त्वाच्या सामन्यांमध्ये मोक्याच्या क्षणी होणाऱ्या चुका टाळणे मरेपुढचे आव्हान आहे. ‘अव्वल चौकडी’ अर्थात फेडरर, जोकोव्हिच आणि नदाल यांच्या पंक्तीत राहण्यासाठी मरेला आपला स्तर उंचवावा लागणार आहे. मारिन चिलीच आणि केई निशिकोरी या युवा शिलेदारांनी सातत्यानं चांगला खेळ करत आपली छाप उमटवली आहे. चिलीचचं ग्रँडस्लॅम जेतेपदाचं स्वप्न एकदा प्रत्यक्षात साकारलं आहे. मात्र ग्रास कोर्टवर त्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आशियाई खंडाचा ध्वज वाहणाऱ्या निशिकोरीला ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावयचं असेल तर त्याच्यापुढे खंडप्राय आव्हान आहे. सातत्य जपण्यात सगळेच जण अपयशी ठरल्याने यंदा खऱ्या अर्थानं जेतेपदासाठी खुला मुकाबला आहे.
महिलांमध्ये सेरेनाच्या पल्याड काहीतरी दर्जेदार खेळ पाहायला मिळावा, एवढीच माफक अपेक्षा आहे. नवनवीन फॅशनच्या वस्त्रप्रावरणाइतकंच खेळाकडे लक्ष दिलं तर सेरेनाच्या दावेदारीला काही आव्हान मिळू शकते. जेतेपद जिंकू शकतील अशा खेळाडूंना मानांकनं दिली जातात. संयोजकांनी ठेवलेल्या विश्वासाला जागत महिला खेळाडू किमान खेळाचे प्रदर्शन करतील अशी टेनिसरसिकांची अपेक्षा आहे.
ग्रँडस्लॅम स्पर्धेत, पुरुष गटात प्रत्येक सामना कस पाहणारा असतो. मात्र महिला गटाचे सामने एकतर्फी आणि नीरस होत असल्याने ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या दर्जाला ओहोटी लागते. भारतासाठी लिएण्डर पेस, रोहन बोपण्णा आणि सानिया मिर्झा या भरवशाच्या नेहमीच्या खेळाडूंवर आपली भिस्त आहे. व्यवस्थेपेक्षा व्यक्तिकेंद्रित विचार आणि अंतर्गत बंडाळ्यांनी ग्रासलेली संघटना यामुळे या त्रिकुटाभोवतीच ग्रँडस्लॅम स्पर्धेतला सहभाग मर्यादित झाला आहे. यंदा एकेरीत तर भारतीय खेळाडूंना पात्रता फेरीचा अडथळाही पार करता आलेला नाही. यामुळे दिवाणखान्यात टेलिव्हिजनच्या पडद्यावर दूरवरच्या हिरवळीवर रंगणाऱ्या मैफलीचा आस्वाद घेणं, एवढंच आपल्या हाती आहे.
पराग फाटक – parag.phatak@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2015 6:07 am

Web Title: wimbledon tennis 2015
Next Stories
1 भारतीय संघाचा झिम्बाब्वे दौरा मार्गावर
2 भारतीय महिला संघात ड्रॅगफ्लिकरची उणीव
3 एकदिवसीय क्रिकेटमधून बॅटिंग पॉवर प्ले हद्दपार!
Just Now!
X