विम्बल्डन टेनिस स्पर्धा अतिशय अव्वल दर्जाची व प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. त्यामुळेच सेंटर कोर्टवर होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यांकरिता चेंडूही सर्वोत्तम पाहिजेत. या सामन्यांकरिता लागणाऱ्या चेंडूंचा प्रवास पन्नास हजार पेक्षा जास्त मैलांचा होतो.
क्रीडासामग्री तयार करणाऱ्या स्लॅझेंगर या स्थानिक कंपनीकडे १९०२ पासून या स्पर्धेकरिता चेंडू व अन्य साहित्य देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या कंपनीचे मुख्यालय शिरेब्रुक (डर्बीशायर) येथे आहे. मात्र विम्बल्डनकरिता लागणाऱ्या चेंडूंचे उत्पादन बटान (फिलिपाईन्स) येथे होते. या चेंडूंकरिता लागणारा कच्चा माल अमेरिका, न्यूझीलंड, चीन, ग्रीस, जपान, थायलंड, मलेशिया, फिलिपाईन्स व इंडोनेशिया येथून येतो. बटान हे लंडनपासून ६ हजार ६६० मैलावर आहे.
वॉर्विकशायर येथील व्यवस्थापन संस्थेतील प्राध्यापक डॉ. मार्क जॉन्सन यांनी या चेंडूंच्या उत्पादन प्रक्रियेचा अभ्यास केला. ते म्हणाले, अकरा देशांमधून  फिरत येथे येईपर्यंत या चेंडूंचा प्रवास ५० हजारपेक्षा जास्त मैलांचा होत असतो.