टेनिसची काशी मानल्या जाणाऱ्या विम्बल्डनच्या मैदानाला भव्य विस्ताराचे वेध लागले आहेत. विम्बल्डनला लागूनच असलेल्या गोल्फ क्लब मैदानाच्या खरेदीचा प्रस्ताव ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लबकडून देण्यात आला आहे.

या मैदानाच्या हस्तांतरणासाठी टेनिस क्लबच्या बाजूने मतदान झाले असून त्याला केवळ न्यायालयीन मंजुरीची आवश्यकता आहे. येत्या २१ डिसेंबरला त्याबाबत न्यायालयाकडून निकाल अपेक्षित असल्याचे क्लबच्या वतीने जाहीर करण्यात आले. विम्बल्डनच्या भवितव्याच्या दृष्टीने आणि क्लबच्या पुढील योजनांच्या दृष्टीने हे खूप मोठे उत्साहवर्धक पाऊल असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

विम्बल्डनवरील सर्व टेनिस कोर्ट मिळून उपलब्ध असलेल्या जागेपेक्षा गोल्फ क्लबची जागा ही तिप्पट असल्याने या विस्ताराची क्लपना येऊ शकते. ‘‘विम्बल्डन पार्क गोल्फ क्लब सदस्यांनी केलेल्या मतदानात टेनिस क्लबला कौल मिळाला असून टेनिसच्या दृष्टीने ही खूप मोठी घटना आहे. काही महिन्यांपूर्वी विशिष्ट लक्ष्य साधण्याचे आम्ही नियोजन केले होते. त्यानुसार सारे घडले असून त्या सुनिश्चित नियोजनाचा लाभ झाला,’’ असे ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लबचे अध्यक्ष फिलिप ब्रुक यांनी सांगितले. या वाढीव जागेवर विम्बल्डनचे पात्रता सामनेदेखील खेळवता येणार आहेत. त्या दृष्टीने या जागतिक स्पर्धेत अधिक रंगत आणता येईल, असा दावा क्लबने केला आहे.