अर्जेंटिनाचं नाव घेतलं की, लगेच डोळयासमोर येतात ते दिएगो मॅरेडोना. काल या महान फुटबॉलपटूने जगाचा निरोप घेतला. वयाच्या ६० व्या वर्षी हृदृयविकाराच्या झटक्यामुळे मॅरेडोना यांची प्राणज्योत मालवली. मॅरेडोना यांचा मृत्यू हा जगभरातील फुटबॉल चाहत्यांसाठी एक धक्का आहे. आपल्या असामान्य प्रतिभेच्या बळावर मॅरेडोना यांनी जगभरात आपले चाहते निर्माण केले.
आजही १९८६ च्या फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेतील अर्जेंटिना आणि इंग्लंडमधला उपांत्यपूर्व फेरीतील तो सामना कोटयवधी फुटबॉल रसिकांच्या स्मरणात आहे. या सामन्यात मॅरेडोना यांनी झळकावलेला एक गोल फुटबॉलविश्वात Hands of God नावाने ओळखला जातो. या सामन्यात मॅरेडोना यांच्या बहारदार खेळामुळे अर्जेंटिनाने इंग्लंडवर २-१ ने विजय मिळवला होता.
जगभरातील प्रेक्षकांसाठी हा फक्त दोन देशांमधील एक फुटबॉल सामना होता. पण मॅरेडोना यांच्यासाठी फुटबॉल सामन्यापेक्षा पण बरच काही होता. स्वत: मॅरेडोना यांनी हे सांगितलं होतं. इंग्लंडवरील विजय हा माझ्यासाठी फुटबॉल सामन्यापेक्षा बरचं काही होता. हा बदला होता. १९८२ साली फाल्कलँड बेटावरुन इंग्लंड आणि अर्जेंटिनात युद्ध झाले. त्या युद्धात अर्जेंटिनाचा पराभव झाला. त्यामुळे १९८६ च्या सामन्यातील इंग्लंडवरील विजय हा एकप्रकारचा बदला होता. २००० साली मॅरेडोना यांच्या जीवनावर प्रसिद्ध झालेल्या ‘आय एम दिएगो’ या आत्मचरित्रात त्यांनी हे म्हटले होते.
आणखी वाचा- मॅरेडोना यांचा वारसा पुढे चालवणारा मेसी म्हणतो…
इंग्लंडवरील विजय म्हणजे ‘आम्ही आमच्या राष्ट्रध्वजाचे रक्षण केले’ असे मॅरेडोना यांनी वर्णन केले होते. “सामना जिंकण्यापेक्षा ते बरच काही होतं. खेळाचा युद्धाशी काही संबंध नाही असे आपण म्हणतो. पण आम्हाला ठाऊक होते. अर्जेंटिनाच्या अनेक नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यांनी पक्ष्यांसारखे आमच्या नागरिकांना मारले होते. त्यामुळे इंग्लंडवरील विजय हा आमचा बदला होता. ‘आम्ही आमच्या राष्ट्रध्वजाचे रक्षण केले” असे मॅरेडोना यांनी आत्मचरित्रात म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 26, 2020 12:59 pm