मुंबई शहरने पुरुषांच्या गटात तर मुंबई उपनगरने महिला गटात विजयी सलामी नोंदवत नंदूरबार येथे सुरू असलेल्या भाई नेरूरकर सुवर्णचषक आमंत्रितांच्या अखिल भारतीय खो-खो स्पर्धेत झोकात प्रारंभ केला.
पुरुषांमध्ये तेजस शिरसकर (३ मि. १० से., १ गडी), निकेत राऊत (१ मि. १० से., ३ गडी) आणि कुणाल नाडकर्णी (२ मि. २० से., १ गडी) यांच्या खेळाच्या बळावर मुंबईने अमरावतीचा १४-१० अशा फरकाने पराभव केला. अमरावतीकडून नवीन आणि नितीन इंदूरकर यांनी प्रत्येकी ३ गडी बाद करीत आपल्या खेळाची चुणूक दाखवली.
महिलांमध्ये मुंबई उपनगरने नागपूरचा २१-१२ असा ९ गुणांनी पराभव केला. उपनगरकडून मयुरी पेडणेकर (२ मि. १० से., ३ गडी), श्रद्धा चौगुले (६ गडी) आणि आरती कदम (१ मि. ५० से., ३ गडी) यांनी अप्रतिम खेळ केला. नागपूरकडून दिपाली सबानेने (२ मि. २० से., ४ गडी) एकाकी झुंज दिली.
किशोर गटात दीपेश म्हसकर (७ मिनिटे नाबाद संरक्षण) आणि संकेत कदम (६ गडी) यांच्या लाजवाब खेळाच्या बळावर ठाण्याने अमरावतीचा एक डाव आणि १० गुणांनी पराभव केला.