जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता एका सामन्याद्वारे न ठरवता सर्वोत्तम तीन लढतींच्या पद्धतीद्वारे (बेस्ट ऑफ थ्री फायनल्स) विजेत्याची निवड करावी, असे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) सुचवले आहे.

भारत-न्यूझीलंड यांच्यात १८ जूनपासून साऊदम्पटन येथे पहिल्यावहिल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. यासाठी बुधवारी भारतीय संघ इंग्लंडच्या दिशेने रवाना झाला. त्यावेळी शास्त्री यांनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या पुढील हंगामांत कोणते बदल असावेत, याविषयी भाष्य केले.

‘‘जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमुळे कसोटी क्रिकेटचा रोमांच जपला जात आहे. भारत-न्यूझीलंड या दोन्ही संघांत एकापेक्षा एक अव्वल खेळाडूंचा भरणा असल्यामुळे चाहत्यांना रोमहर्षक लढत पाहायला मिळेल. मात्र यापुढे या स्पर्धेत फक्त एकच अंतिम सामना खेळवण्यापेक्षा तीन सामन्यांची मालिका खेळवणे सोयीचे ठरेल,’’ असे शास्त्री म्हणाले.

‘‘खेळाडूच्या कौशल्याची परीक्षा घेणे, हाच कसोटी प्रकाराचा मूळ हेतू असतो. त्यामुळे पुढील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचलेल्या दोन्ही संघांमध्ये तीन सामने खेळवावे. यापैकी दोन जिंकणारा साहजिकपणे विजेता होईल. मात्र ही मालिका बरोबरीत सुटली तरी स्पर्धेच्या सुरुवातीपासून उत्तम कामगिरी करणाऱ्या किंवा गटसाखळीच्या अखेरीस अग्रस्थानी असलेल्या संघाला जेतेपद बहाल करता येऊ शकते,’’ असेही शास्त्री यांनी सांगितले.