४ मार्च २०१२ हाच तो दिवस.. भारताच्या रणरागिणींनी पाटण्याचे रणांगण जिंकले.. भारताच्या महिला संघाने कबड्डीच्या जागतिक व्यासपीठावर क्रांतीची पहिली मोहोर उमटवली.. बिहारमध्ये झालेल्या पहिल्याच विश्वविजेतेपदावर भारताने आपले नाव कोरले.. ज्या इराणी आव्हानाने २०१०मध्ये झालेल्या एशियाडच्या उपांत्य फेरीत भारतापुढे आव्हान उभे केले होते, त्याच इराणचा २५-१९ असा पाडाव करीत भारताने जगज्जेतेपदावर नाव कोरले.. त्या सुवर्णक्षणाची सोमवारी वर्षपूर्ती झाली.. ममता पुजारीचे नेतृत्व आणि रमेश भेंडिगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा इतिहास रचला गेला.. त्या क्षणाच्या आठवणी त्या संघातील खेळाडूंनी मांडल्या.
‘‘विश्वविजेतेपदाचा तो क्षण मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. एक वर्ष झाले असे वाटतच नाही. तो क्षण आम्ही आताही जगतोय असे वाटते. विश्वचषक जिंकणे आमच्यासाठी खास होते. ते क्षण आम्हा सर्वासाठी खास आहेत. महिला विश्वचषक कबड्डी स्पध्रेत पुरुषांच्या विश्वचषकापेक्षा अधिक संघ सहभागी झाले होते. हा विश्वचषक कबड्डीसाठी आणि महिलांसाठी प्रेरणादायी ठरला होता. माझ्या छोटय़ाशा गावातही माझ्या जगज्जेतेपदाचे मोठे कौतुक होते!’’
ममता पुजारी, भारताची कर्णधार
‘‘वर्षपूर्तीचा हा क्षण आठवणींना उजळा देणाराच आहे. आम्हा मुलींच्या मेहनतीचे चीज झाले. आम्ही अप्रतिम कामगिरी करून काही दिवस अविश्रांत मेहनतीने हे यश मिळवून दिले होते. त्यानंतर महाराष्ट्रात सरकार आणि लोकांनी खूप प्रेम व्यक्त केले. ते आत्मविश्वास दुणावणारे होते. कबड्डी खेळणाऱ्या उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रेरणादायी होते.’’
दीपिका जोसेफ, भारताची कबड्डीपटू
‘‘विश्वविजेतेपदाचा क्षण आताही आठवला तरी अंगावर रोमांच येतात. माझ्या जीवनातील तो सर्वात संस्मरणीय क्षण असे मी त्याचे वर्णन करेन. तो क्षण पुन्हा पुन: यावा, असे वाटते. भारतासाठी पुन्हा खेळावे आणि भारताला अधिकाधिक यश मिळवून द्यावे, ही प्रेरणा साद घालते. त्या आठवणी नेहमीच सोबत करतात.’’
अभिलाषा म्हात्रे, भारताची कबड्डीपटू
‘‘शिवशक्ती संघातील माझ्या सहकारी खेळाडूंसह गेले चार दिवस मी ते क्षण जिवंत करते आहे. आज आम्ही याच दिवशी गेल्या वर्षी या संघाशी भिडलो होतो. वर्ष कसे भर्रकन सरले. पण आठवणी तशाच ताज्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे माझे ते पहिलेच वर्ष होते. त्यामुळे दडपण आणि उत्सुकता असे दोन्ही भाव माझ्या मनात होते. आनंद काय असतो, याची व्याख्या मला प्रथमच त्यावेळी उमगली. जगज्जेतेपदाच्या दुसऱ्या दिवशी होळी होती. आमच्या निवासस्थानाच्या हॉटेलवर भारतीय संघातील आम्ही सर्व खेळाडूंनी एकमेकांना रंगवून धम्माल उडवून दिली होती.’’
सुवर्णा बारटक्के, भारताची कबड्डीपटू
ताजा कलम
राजा उदार झाला, त्याचे काय झाले हो?
महाराष्ट्राच्या शासकीय सेवेविषयी ‘देर है पर अंधेर नहीं’ असे म्हटले जाते. खेळाचा विषय जेव्हा येतो तेव्हा दिरंगाई हा शब्द नेहमीच परवलीचा असतो. गतवर्षी भारताने महिला कबड्डी विश्वचषक जिंकण्याची किमया साधली. या संघात दीपिका जोसेफ, सुवर्णा बारटक्के आणि अभिलाषा म्हात्रे या महाराष्ट्राच्या तीन मुलींचा समावेश होता. याचप्रमाणे प्रशिक्षकपदाची जबाबदारी महाराष्ट्राच्याच रमेश भेंडिगिरी यांनी सांभाळली होती. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी प्रयत्न करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून या कबड्डीपटूंना इनाम देण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. ‘राजा उदार झाला..’ सरकारने विश्वविजेत्या कबड्डीपटूंना प्रत्येकी एक कोटी आणि प्रशिक्षक भेंडिगिरी यांना २५ लाख रुपये देण्याची घोषणा मोठय़ा रुबाबात केली. पण वर्ष सरले तरी ही प्रतीक्षा काही संपली नाही. मध्यंतरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयाला लागलेल्या आगीमुळे दिरंगाई होत असल्याचे कारण सांगितले होते. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनीही आता अजून उशीर होणार नाही, असे स्पष्ट केले. पण आश्वासने आणि फक्त आश्वासनेच पदरी पडली. मंत्रालयात चौकशी केली असता वित्त विभागाकडे प्रक्रिया सुरू आहे, असे सांगण्यात आले. कोर्टाची पायरी चढणाऱ्यांसाठी ‘तारीख पे तारीख’ तरी असते पण इथे तीही नाही, फक्त प्रतीक्षाच आहे. कबड्डीपटूंना क्रिकेटपटूंप्रमाणेच करोडपती बनविण्याचे सरकारचे धोरण नक्कीच प्रशंसनीय आहे. त्यामुळे कबड्डी खेळाकडे वळणाऱ्या मुलांचा दृष्टीकोन बदलेल. सरकारने कबड्डीपटूंच्या नोकऱ्यांसाठीही चांगले प्रयत्न केले आहेत. आजमितीला स्नेहल साळुंखे मुंबईची जिल्हा क्रीडा अधिकारी हे पद अभिमानाने भूषवित आहे. दिपिका जोसेफ आणि पंकज शिरसाट यांनाही सरकारी नोकरी मिळाली आहे. या साऱ्या गोष्टी कबड्डीसाठी सकारात्मकच आहेत. तरी जाहीर सत्कार आणि रोख इनाम हे कुणालाही हुरूप आणणारेच असते. आधीच वर्षभराच्या दिरंगाईने त्यातली रंगत जरी ओसरत असली आणि सरकारचेच हसे होत असले तरी आता अधिक विलंब न लावता कबड्डीपटूंना कोटय़धीश करावे, अशी क्रीडाप्रेमींची इच्छा आहे.

Sandeep Sharma may replace Shami
RR vs MI : टीम इंडियाच्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाचा शोध संपला! ‘हा’ गोलंदाज घेऊ शकतो मोहम्मद शमीची जागा
Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील