कतार येथे २०२२ मध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेच्या तारखा पुढे ढकलण्याची शक्यता आहे, मात्र त्याच वर्षी होणारी हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा हीच आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघापुढील (फिफा) अडचण ठरणार आहे.
कतार येथे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. मात्र, त्या काळात कतारमध्ये खूप उन्हाळा असतो व त्याचा त्रास खेळाडूंना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या स्पर्धा दोन तीन महिन्यांनी पुढे ढकलण्याची शक्यता आहे. मात्र फिफाचे अध्यक्ष मायकेल प्लॅटिनी यांनी एकाच वेळी हिवाळी ऑलिम्पिक व फिफा विश्वचषक स्पर्धा येणार नाहीत, असे आश्वासन आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला (आयओसी) दिले आहे.
आयओसीचे अध्यक्ष थॉमस बॅच यांनी सांगितले,की एकाच वेळी दोन महत्त्वपूर्ण स्पर्धा येणे कोणत्याही संयोजकांच्या हिताचे ठरणार नाही. आम्ही फिफाला हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा फेब्रुवारी महिन्यात आयोजित केली जाईल व या स्पर्धा पुढे ढकलण्याची शक्यता नसल्याचे कळविले आहे. या स्पर्धेच्या संयोजनासाठी बीजिंग व अल्माटी या दोन शहरांमध्ये चुरस आहे. फिफा विश्वचषक स्पर्धा जानेवारी-फेब्रुवारी किंवा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आयोजित करावी असे आम्ही सुचविले आहे. एकाच वेळी या दोन्ही स्पर्धा झाल्या तर क्रीडा क्षेत्रावर त्याचा अनिष्ट परिणाम होईल. खेळाडूंच्या कामगिरीकडे अपेक्षेइतके लक्ष दिले जाणार नाही. अपेक्षेइतकी प्रसिद्धीही मिळणार नाही.