आयपीएल २०२१ अनिश्चित काळासाठी तहकूब झाल्यानंतर आता भारताचे खेळाडू इंग्लंडच्या दौर्‍यावर जातील. न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासह तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीच्या या दौऱ्यावर टीम इंडिया सहा कसोटी सामने खेळणार आहे. यजमान इंग्लंडविरुद्ध भारत पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. या दौऱ्याआधी विस्डेनने आयसीसीच्या रँकिंगनुसार आपली सार्वकालिन भारताच्या कसोटी संघाची निवड केली आहे. विशेष म्हणजे विराट कोहलीला संघाचे नेतृत्व सोपवले गेले आहे.

सलामीवीर म्हणून विस्डेनने महान खेळाडू सुनील गावसकर आणि कसोटी तज्ज्ञ राहुल द्रविडची निवड केली आहे. संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागला स्थान मिळू शकलेले नाही. जर टीमच्या मधल्या फळीवर नजर टाकली तर विस्डेनने अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी चेतेश्वर पुजारा आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची निवड केली आहे. या संघात कर्णधार विराट कोहली पाचव्या क्रमांकावर आहे.

कुस्तीपटू सुशील कुमारला अटक; दिल्ली पोलिसांनी ठोकल्या बेड्या

आयपीएल २०२१मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतलाही या संघात स्थान मिळाले आहे. विस्डेनने भारताचा महान माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला न निवडता पंतची यष्टीरक्षक म्हणून निवड केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या शानदार कामगिरीनंतर पंत या संघात स्थान मिळवण्यात यशस्वी झाला आहे. माजी कर्णधार कपिल देव यांना सातव्या क्रमांकासाठी जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये निवडले गेले आहे. विस्डेनने या संघात तीन फिरकीपटूंची निवड केली असून त्यात अनिल कुंबळे, रवींद्र जडेजा आणि आर. अश्विन यांचा समावेश आहे. संघातील अन्य गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराहचाही समावेश आहे.

विस्डेनने निवडलेला भारतीय कसोटी संघ

सुनील गावसकर, राहुल द्रविड, चेतेश्वर पुजारा, सचिन तेंडुलकर, विराट कोहली (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कपिल देव, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अनिल कुंबळे, जसप्रीत बुमराह.