देशभरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. मात्र ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. यासाठी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात बीसीसीआय स्पर्धेचं आयोजन करता येईल का याची चाचपणी करत आहे. यासाठी ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात आयोजित टी-२० विश्वचषकाबद्दल आयसीसी जुलै महिन्यात नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तेराव्या हंगामासाठी बीसीसीआयने सर्व तयारी केली असल्याचे संकेत काही दिवसांपूर्वी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिले होते. BCCI मधील सुत्रांनी The New Indian Express ला दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या हंगामाची आयपीएल स्पर्धा बाहेर झाल्यास UAE क्रिकेट बोर्डाला बीसीसीआयची पहिली पसंती असणार आहे. आतापर्यंत श्रीलंका आणि UAE या क्रिकेट बोर्डांनी बीसीसीआयला आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्याची परवानगी दिली आहे.

“सामने Bio-Secure वातावरणात खेळवावे लागतील यासाठी UAE हा उत्तम पर्याय आहे. कोणत्याही बाहेरील व्यक्तीला प्रवेश मिळणार नाही अशी जागा शोधणं सध्याच्या घडीला गरजेचं आहे. UAE मध्ये संघांसाठी दोन-तीन हॉटेलची व्यवस्था केल्यानंतर हे सहज शक्य आहे असं वाटतंय. आयपीएलमध्ये बाहेरील देशांचे खेळाडू सहभागी होतील यासाठी सर्व नियमांचं काटेकोर पालन होणं गरजेचं आहे, UAE मध्ये याची सोय होऊ शकते. याचसोबत प्रवासाचा वेळही वाचू शकतो, याआधीही UAE मध्ये आयपीएलचे सामने खेळवले गेले आहेत”, त्यामुळे सध्याच्या निकषांमध्ये UAE हे पहिल्या स्थानावर असल्याचं BCCI च्या सुत्रांनी सांगितलं.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी ऑस्ट्रेलियातील काही निर्बंध शिथील करण्यात येत असल्याची घोषणा करत क्रीडा स्पर्धांना मान्यता दिली आहे. याचसोबत सामना पाहण्यासाठी मैदानाच्या एकूण क्षमतेपेक्षा २५ टक्के लोकांना प्रवेश दिला जाईल असंही मॉरिसन यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे आगामी टी-२० विश्वचषकाबद्दल ऑस्ट्रेलियन सरकारने अद्याप आशा सोडलेल्या नसल्याचं चित्र पहायला मिळतंय. ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय कॅबिनेट बैठकीत मॉरिसन यांनी क्रीडा, महोत्सव आणि कॉन्सर्ट यासाठी नवीन नियम जाहीर केले. ज्यामुळे बीसीसीआयसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियात प्रस्तावित टी-२० विश्वचषक झाल्यास बीसीसीआयला आयपीएलचा तेरावा हंगाम रद्द करावा लागू शकतो.