ऑस्ट्रेलियात झालेल्या २०१५च्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यापूर्वी गुडघ्याला दुखापत झालेली असतानाही कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या सांगण्यावरून मी खेळलो, अशी कबुली भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने गुरुवारी दिली.

मार्च २०१५मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या उपांत्य सामन्यानंतर शमी थेट जुलै, २०१६मध्ये आंतरराष्ट्रीय सामना खेळला. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला जवळपास वर्षभराचा अवधी गेला. भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणशी ‘इन्स्टाग्राम’वर थेट संवाद साधताना शमीने याबाबत खुलासा केला.

‘‘ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वीच गुडघ्याच्या दुखापतीविषयी संघसहकाऱ्यांना कळवले. विशेष म्हणजे प्रत्यक्षात सामन्याच्या दिवशी मला असह्य़ वेदना जाणवत होत्या. परंतु संघ व्यवस्थापन आणि धोनी यांनी माझे प्रोत्साहन वाढवले,’’ असे शमी म्हणाला.

‘‘धोनीने स्वत: माझ्याशी संवाद साधून विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात तुझ्यासारख्या गोलंदाजाला आम्ही संघाबाहेर ठेवू शकत नाही, असे सांगितले. त्यामुळेच मी तात्काळ उपचार घेत सामना खेळण्यासाठी उतरलो,’’ असे शमीने सांगितले.

त्याशिवाय संपूर्ण विश्वचषकादरम्यानच आपल्याभोवती दुखापतीचे चक्र फिरतच होते, असेही शमीने नमूद केले. शमीच्या या खुलाशांमुळे समाजमाध्यमांवर मात्र क्रीडाप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे.