न्यूझीलंडविरुद्ध पहिल्याच टी-20 सामन्यात भारताला 80 धावांनी पराभव पत्करावा लागला. विजयासाठी दिलेलं 220 धावांचं आव्हान भारतीय संघाला पेलवलं नाही. ठराविक अपवाद वगळता भारताचे सर्व फलंदाज पहिल्या सामन्यात झटपट माघारी परतले. 19.2 षटकात भारताचा संघ 139 धावांपर्यंतच मजल मारु शकला. कर्णधार रोहित शर्मा भारताच्या फलंदाजांच्या कामगिरीवर नाराज झाला आहे. संघात 8 फलंदाजांची फौज असताना, 200 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग व्हायलाच हवा असं परखड मत रोहित शर्माने व्यक्त केलं आहे.
अवश्य वाचा – IND vs NZ : …..म्हणून पहिल्या टी-20 सामन्यात भारत पराभूत, कृणाल पांड्याने सांगितलं कारण
“कालचा सामना खरचं अवघड होता. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात न्यूझीलंडने आमच्यावर मात केली. आमची सुरुवातच चांगली झाली नाही, त्यानंतर 200 धावांचं लक्ष्य पार करणं कठीण जाणार याचा आम्हाला अंदाज आला होता. मात्र याआधीही आम्ही 200 पेक्षा जास्त धावांची लक्ष्य पार केली आहेत. यासाठीच आम्ही 8 फलंदाजांनिशी मैदानात उतरलो होतो, ज्यावेळी तुमच्याकडे फलंदाजांची इतकी मोठी फौज असते तेव्हा लक्ष्य कितीही मोठं असलं तरीही त्याचा पाठलाग व्हायलाच हवा. मात्र भागीदारी रचणंच आम्हाला जमलं नाही. त्यामुळे पुढच्या सामन्यासाठी आम्हाला नवीन विचाराने मैदानावर उतरावं लागणार आहे.” रोहितने भारताच्या फलंदाजीबद्दल आपलं परखड मत व्यक्त केलं.
वेलिंग्टनच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षकांनी पुरती निराशा केली. महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक यांनी मोक्याच्या क्षणी महत्वाच्या खेळाडूंचे झेल टाकले, ज्याचा पुरेपूर फायदा न्यूझीलंडच्या फलंदाजांनी घेतला. या मालिकेतला दुसरा सामना शुक्रवारी खेळवण्यात येणार आहे.
अवश्य वाचा – विश्वचषकासाठी भारतीय संघात मोहम्मद शमी हवाच !
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 7, 2019 10:42 am