घरच्या मैदानावर खेळणाऱ्या मुंबईने रणजी करंडक सामन्यात गुजरातविरुद्ध पहिल्या डावात 297 धावांपर्यंत मजल मारली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय गुजरातच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. मुंबईकडून मधल्या फळीत सिद्धेश लाडचं अर्धशतक आणि तळातल्या फळीमध्ये शिवम दुबेने केलेल्या शतकाच्या जोरावर मुंबईने आपला डाव सावरला.

पहिल्या दिवसाच्या खेळात मुंबईची सुरुवात खराब झाली. सलामीवीर अखिल हेरवाडकर आणि जय बिस्ता स्वस्तात माघारी परतले. यानंतर सिद्धेश लाडने सूर्यकुमार यादवसोबत मुंबईच्या डावाला आकार दिला. मात्र सूर्यकुमार यादव माघारी परतल्यानंतर अरमान जाफर आणि आदित्य तरे भोपळाही न फोडता माघारी परतल्यामुळे मुंबईचा संघ अडचणीत सापडला.

यानंतर खेळपट्टीवर आलेल्या शिवम दुबेने सर्वात प्रथम सिद्धेश लाड आणि त्यानंतर तळातल्या फलंदाजांच्या साथीने मुंबईचा डाव सावरला. गुजरातच्या आक्रमणाचा समर्थपणे सामना करत शिवम दुबेने मुंबईसाठी धावांचा ओघ सुरु ठेवला. 110 धावांवर शिवम पियुष चावलाच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर ध्रुवील मटकरने अखेरच्या सत्रात फटकेबाजी करुन संघाला 250 चा टप्पा ओलांडून दिला. गुजरातकडून अरझान नागवसवालाने 5 बळी घेतले. त्याला रुश कलारियाने 3 तर पियुष चावलाने 1 बळी घेत चांगली साथ दिली. मुंबईचा एक फलंदाज धावबाद झाला.