करोना व्हायसरचा प्रादुर्भाव सध्या सर्व जगभरात आहे. काही देश करोनाशी दोन हात करून त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत. करोना व्हायरसचा फटका क्रीडाविश्वालाही बसला असून IPL 2020 आणि T20 World Cup 2020 या दोन्ही स्पर्धांचे आयोजन होणार की नाही? झाल्यास कधी होणार? असे विविध प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच या दोन स्पर्धांच्या जोडीनेच आणखी एका स्पर्धेचे भविष्यदेखील अधांतरी आहे. ती स्पर्धा म्हणजे आशिया चषक…!

सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आशिया चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पण भारत सरकारने आपले खेळाडू पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिल्याने ही स्पर्धा कदाचित युएईमध्ये आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. पण करोनाच्या तडाख्यातून अद्याप अनेक सावरू शकलेले नाहीत. आशिया खंडातील क्रिकेच खेळणारे देशही करोनाशी झुंजत आहेत. अशा परिस्थितीत आशिया चषकाचे आयोजन करावे की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

आशिया चषकाच्या आयोजनाबाबत निर्णय घेण्याच्या दृष्टीने सोमवारी आशियाई क्रिकेट परिषदेच्या सदस्यांची व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून बैठक झाली. या बैठकीत आशिया चषक स्पर्धेसंबंधी चर्चा झाली, पण या चर्चेतून कोणताही अंतिम निर्णय घेता आला नाही. त्यामुळे आता याच महिन्यात काही दिवसांनी पुन्हा एकदा या संदर्भात बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

BCCI कडून या बैठकीचे प्रतिनिधित्व अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी केले. बांगलादेश क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष नझमुल हसन पपॉन यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली. “करोनाच्या तडाख्यामुळे विस्कळीत झालेले क्रिकेटचे वेळापत्रक पाहता आशिया चषकाचे आयोजन करण्यासाठी उपलब्ध असलेल्या जागांची बैठकीत चर्चा करण्यात आली. आशिया चषकाच्या आयोजनाबाबतचा अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल”, अशी माहिती ACC ने जारी केलेल्या पत्रकात देण्यात आली.