आयपीएल गुणतालिकेत दिल्ली डेअरडेव्हिल्सचा संघ तळाला आहे, तर किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ अव्वल स्थानावर विराजमान आहे. दिल्लीच्या पराभवाने त्यांचे कोणतेच नुकसान होणार नाही, परंतु किंग्ज इलेव्हन पंजाबच्या पराभवामुळे आयपीएलच्या अंतिम चौघांच्या स्थानात मात्र नक्की बदल होईल. त्यामुळेच या ‘हिरो आणि झीरो’ संघाच्या लढतीमध्ये विजयश्री कोणाच्या गळ्यात पडेल, ही उत्सुकता सर्वाना असेल.
केव्हिन पीटरसनच्या नेतृत्वाखालील दिल्लीच्या संघाला ११ सामन्यांमध्ये फक्त दोन विजय मिळवता आले आहे. यापैकी मागील सहा सामन्यांमध्ये पराभव टाळण्यासाठी प्रयत्नही करताना हा संघ दिसला नाही. आयपीएलच्या लिलावामध्ये नऊ लाखांचा भाव मिळवणारा पीटरसन सपशेल अपयशी ठरल्याचे सिद्ध झाले. फलंदाजांमधील सातत्याचा अभाव त्यांच्या अपयशास कारणीभूत ठरला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची गुणवत्तासुद्धा त्यांना तारू शकली नाही. आयपीएलमधील फलंदाजांच्या यादीत अव्वल दहांमध्ये असलेल्या जीन-पॉल डय़ुमिनी वगळता दिल्लीच्या एकाही फलंदाजाला आपली छाप पाडता आली नाही. क्विंटन डी कॉक, पीटरसन, मयांक अगरवाल आणि दिनेश कार्तिक यांनी दिल्लीला सावरण्याचे प्रयत्न केले, पण दिल्ली डेअरडेव्हिल्सला एक संघ म्हणून कार्यरत होता आले नाही. प्रमुख प्रशिक्षक गॅरी कर्स्टन आणि गोलंदाजीचे सल्लागार इरिक सिमॉन्ससुद्धा दिल्लीला यशाचा मार्ग दाखवू शकले नाही.
पंजाबच्या संघाची कामगिरी मात्र स्वप्नवत होत आहे. ‘ऑरेंज’ कॅपधारक ग्लेन मॅक्सवेल आपल्या एकापेक्षा एक सरस खेळींनिशी क्रिकेटरसिकांचे मनोरंजन करीत आहे. मजबूत फलंदाजीच्या बळावर दोनशेहून अधिक धावसंख्येचे आव्हान पंजाबने यंदाच्या हंगामात अनेकदा सहज पेलले.