करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशामध्ये सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. देशाला आर्थिक फटका बसण्याबरोबरच बेरोजगारीचेही प्रमाणही वाढले आहे. हातावर पोट असणाऱ्या अनेकांना आपल्या राज्यात परत जावे लागले आहे. तर काहीजण हाताला मिळेल ते काम करताना दिसत आहेत. क्रिडा क्षेत्रालाही करोनाचा फटका बसला असून अनेक खेळाडूंसमोर अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. काही खेळाडूंना तर आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी मिळेल ते काम करावं लागत आहे. असं एक नाव आहे राष्ट्रीय सुवर्णपद विजेता तिरंदाज अनिल लोहार.

न्यूज १८ ने दिलेल्या बातमीनुसार अनिल आणि त्याचे कुटुंबिय आर्थिक संकटात सापडले आहेत. झारखंडमधील सारायकेला येथील खरसावा गावात राहणारा अनिल आणि त्याच्या कुटुंबियासमोर आर्थिक संकटाबरोबरच पाण्याचे संकटही आहे. अनिलच्या कुटुंबियांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळवण्यासाठी गावातील शाळेतील पाणीपुरवठ्यावर अवलंबून रहावं लागत आहे. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळेच आता अनिल आणि त्याच्या पत्नीने स्वत: विहीर खोदण्यास सुरुवात केली आहे. दिवसातून चार तास हे पती-पत्नी विहीर खोदण्याचे काम करतात. मागील २५ दिवसांमध्ये या दोघांनी २० फूट खोल खड्डा खणला आहे.

“मागील वर्षी मार्च महिन्यात झारखंडमध्ये झालेल्या राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेमध्ये मी सांघिक गटामध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं. या कामगिरीनंतर खेळाडूंसाठीच्या आरक्षित जांगांवर सरकारी नोकरी मिळेल असं मला वाटलं होतं. मात्र तसं काहीही झालं नाही. मी एक खासगी नोकरी करायचो. मात्र सरावामुळे नोकरी करताना अडचणी येत असल्याने ती सोडावी लागली,” असं अनिल सांगतो.

कुटुंबाचा उदर्निवाह चालवण्यासाठी अनिलवर आता कोंबडीचे मांस विकण्याची वेळ आली आहे. आर्थिक चणचण असताना अनिलला सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही.