जिमनॅस्टिक दीपा कर्माकरबद्दल ट्विट करणा-या एका महिलेला बलात्काराच्या आणि जिवे मारण्याच्या धमक्या सोशल मीडियावर मिळू लागल्या. चौदा तारखेला दीपाचा सामना होता. संपूर्ण देशाला तिच्याकडून पदकाच्या अपेक्षा होता, त्यामुळे भारताचे लक्ष या सामन्यावर होते. या समान्यादरम्यान एका तरूणीने ट्विट केले आणि या ट्विटमुळे तिला जीवे मारण्या-या आणि बलात्काराच्या धमक्या मिळू लागल्या. या महिलेने १४ तारखेला ट्विट केले होते. ‘दिपा वॉल्ट प्रकारात अंतिम फेरीत पोहचली याबद्दल तिचे अभिनंदन. पण अंतिम फेरीत असलेल्या आणि श्रीमंत देशातून आलेल्या तिच्या प्रतिस्पर्धी जिमनॅस्टिकना गुण कमावण्यासाठी आपले आयुष्य धोक्यात घालून हा प्रकार करण्याची गरज भासत नाही. ते वॉल्टमध्ये सोप्यातले सोपे प्रकार करतात. त्यांना चांगल्या सुविधा आणि प्रशिक्षण देखील दिले जाते. पण आज (१४ ऑगस्टला ) होणा-या सामन्यात ती प्रोड्युनोव्हा हा सगळ्यात कठीण प्रकार करून आपला जीव धोक्यात घालणार आहे. ते सुद्धा फक्त देशाला पदक मिळवून देण्यासाठी. कोणत्याही देशासाठी पदक मिळवण्याकरता आपला जीव धोक्यात घालून खेळण्याची गरज नाही.’ असे ट्विट या महिलेने केले होते. तिच्या या ट्विटवर अनेक आक्षेपार्ह प्रतिक्रिया या महिलेला आल्या. त्यानंतर घाबरलेल्या या महिलेने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मदतीची याचना केली. या धमक्यांबद्दल राजस्थान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे. परंतु तिला आलेल्या धमक्याचे आयपी अॅडरेस्ट पाहता त्या बाहेरच्या देशातून आले असल्याचे पोलीसांनी सांगितले. त्यामुळे तिला धमक्या पाठवणारे नेमके कोण आहेत याचा शोध घ्यायला थोडा अवधी लागले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.