महिला चॅलेंज क्रिकेट स्पर्धा

स्मृती मानधनाच्या अर्धशतकासह गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीमुळे ट्रेलब्लेझर्स संघाने सुपरनोव्हाजवर १६ धावांनी विजय मिळवत महिला चॅलेंज ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेचे प्रथमच विजेतेपद पटकावले.

विजयासाठी ११९ धावांचे लक्ष्य गाठताना सुपरनोव्हाज ७ बाद १०२ धावाच करू शकला. दीप्ती शर्मा आणि सलमा खातून या फिरकीपटूंपुढे सुपरनोव्हाजचे फलंदाज अपयशी ठरले. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी भरवशाची सलामीवीर चामरी अटापट्टू (६) फार काळ तग धरू शकली नाही. त्यामुळे सुपरनोव्हाजचे दडपण वाढले. हरमनप्रीत कौरला (३०) सुरुवातीपासून मोठे फटके खेळता आले नाहीत. त्यामुळे सुपरनोव्हाजचा पराभव निश्चित झाला.

तत्पूर्वी, मानधनाच्या अर्धशतकानंतरही राधा यादवने पाच बळी घेतल्याने ट्रेलब्लेझर्स सुपरनोव्हाजविरुद्ध २० षटकांत ८ बाद ११८ धावाच करू शकला. मानधनाला (४९ चेंडूंत ६८) तिची सलामीची सहकारी ड्रियांड्रा डॉटिनने (२०) साथ दिल्याने या दोघींनी ११ षटकांत ७१ धावांची सलामी दिली. मानधनाच्या खेळीत पाच चौकार आणि तीन षटकार समाविष्ट आहेत. मात्र डॉटिन बाद झाल्यावर राधाच्या फिरकीपुढे ट्रेलब्लेझर्सच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केली. चार षटकांत अवघ्या १६ धावा देत राधाने पाच बळी मिळवले. राधाने डावाच्या अखेरच्या २०व्या षटकात तीन फलंदाज बाद केले.

संक्षिप्त धावफलक

ट्रेलब्लेझर्स : २० षटकांत ८ बाद ११८ (स्मृती मानधना ६८, ड्रियांड्रा डॉटिन २०; राधा यादव ५/१६, शशिकला शिरीवर्धने १/२२) विजयी वि. सुपरनोव्हाज : २० षटकांत ७ बाद १०२ (हरमनपीत कौर ३०, शशिकला शिरीवर्धने १९; सलमा खातून ३/१८, दीप्ती शर्मा २/९, सोफी एस्सेलस्टोन १/२६)

५ राधा यादवने यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम गोलंदाजीची कामगिरी करताना पाच बळी मिळवले. या स्पर्धेत एकूण ८ बळी घेत ती सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली.

२ स्मृती मानधनाने तीन सामन्यांत १०७ धावा फटकावत यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसरे स्थान मिळवले.